वृत्तसंस्था/ मीरपूर
भारत आणि यजमान बांगलादेश महिला क्रिकेट संघातील तीन सामन्यांच्या वनडे मालिकेतील तिसरा आणि निर्णायक सामना शनिवारी येथे खेळवला जात आहे. या सामन्याला सकाळी 9 वाजता प्रारंभ होईल. दोन्ही संघांनी प्रत्येकी एक सामना जिंकला असल्याने शनिवारचा निर्णायक सामना अटीतटीचा अपेक्षित आहे.

या मालिकेत झालेल्या पहिल्या सामन्यात भारतीय महिला संघाला यजमान बांगलादेशकडून ऐतिहासिक पराभव पत्करावा लागला. बांगलादेश महिला संघाने भारतावर मिळवलेला हा पहिला विजय होता. पण त्यानंतर गेल्या बुधवारी झालेल्या या मालिकेतील दुसऱ्या सामन्यात भारताने बांगलादेशचा 108 धावांनी दणदणीत पराभव करून बांगलादेशसी बरोबरी साधली आहे. शनिवारच्या निर्णायक सामन्यात विजयासाठी भारतीय संघाला आपल्या फलंदाजीत सुधारणा करणे जरुरीचे आहे. या मालिकेमुळे भारतीय महिला क्रिकेटपटूंना बांगलादेशमधील खेळपट्ट्यांचा स्वभाव तसेच वातावरण याची थोडीफार जाणीव झाली आहे. पुढील वर्षी बांगलादेशमध्ये होणाऱ्या महिलांच्या विश्वचषक क्रिकेट स्पर्धेवेळी भारतीय संघाला बांगलादेशमधील खेळपट्ट्या नवख्या ठरणार नाहीत.
या वनडे मालिकेतील पहिल्या सामन्यात भारतीय फलंदाजी पूर्णपणे कोलमडली होती पण दुसऱ्या सामन्यात भारतीय फलंदाजी थोडी फार सुधारणा झाल्याचे जाणवते. कर्णधार हरमनप्रित कौर जेमिमा रॉड्रिग्ज यांची अर्धशतके महत्त्वाची ठरली होती. सलामीची फलंदाज स्मृती मानधना फलंदाजीचा सूर मिळवण्यासाठी तसेच बॅडपॅचमधून बाहेर पडण्याकरिता झगडत आहे. उभय संघातील टी-20 मालिकेतही मानधनाची फलंदाजी समाधानकारक झाली नाही. त्यानंतर गेल्या दोन वनडे सामन्यात तिने केवळ 47 धावा जमवल्या आहेत. अनुभवी शेफाली वर्माच्या जागी प्रिया पुनियाला संधी देण्यात आली आहे. कर्णधार हरमनप्रित कौर दुखापती समस्येतून आता पूर्णपणे तंदुरुस्त झाली आहे. दुसऱ्या सामन्यात क्षेत्ररक्षण करताना तिच्या डाव्या हाताच्या मनगटाला दुखापत झाली होती. भारतीय गोलंदाजी या मालिकेत समाधानकारक कामगिरी करत आहे. देविका वैद्य, रॉड्रीग्ज यांनी दुसऱ्या सामन्यात सात गडी बाद केले होते. बांगलादेश संघातील फलंदाज फरगेना हक हिने दोन सामन्यात 74 धावा तर निगार सुलतानाने दोन सामन्यात 42 धावा जमवल्या आहेत. शनिवारच्या सामन्यात नाणेफेकीचा कौल महत्त्वाचा असून त्यानंतरच उभय संघातील अंतिम अकरा खेळाडू निश्चित केले जातील.
भारत : हरमनप्रित कौर (कर्णधार), स्मृती मानधना, दीप्ती शर्मा, शेफाली वर्मा, जेमिमा रॉड्रीग्ज, यास्तिका भाटिया, हर्लिन देओल, देविका वैद्य, उमा छेत्री, अमनज्योत कॉर, प्रिया पुनिया, पूजा वस्त्रकार, मेघना सिंग, अंजली सर्वानी, मोनिका पटेल, राशी कनोजिया, अनुशा बॅरेडी आणि स्नेह राणा.
बांगलादेश : निगार सुलताना (कर्णधार), नाहिदा अख्तर, मुर्शिदा खातून, फर्गेना हक, शोभना मोस्तरी, शोरना अख्तर, रिटू मोनी, लता मोंडल, दिशा विश्वास, सलमा खातून, मारुफा अख्तर, शर्मिन अख्तर, संजिदा अख्तर, रेबिया खान, सुलताना खातून, फईमा खातून आणि शमिमा सुलताना.









