प्रादेशिक आयुक्त एम. जी. हिरेमठ यांची माहिती
बेळगाव : पाणी समस्या गंभीर बनत चालल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत. त्याबाबत योग्य विचार विनिमय करून लवकरच पाणी समस्या निवारण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत. जलाशयांमध्ये सध्या पाणी आहे. त्यामुळे घाबरण्याचे काही कारण नाही. योग्य नियोजन करून संबंधित गावांना पाणीपुरवठा केला जाईल, अशी माहिती प्रादेशिक आयुक्त एम. जी. हिरेमठ यांनी दिली आहे. उत्तर कर्नाटकमध्ये पिण्याच्या पाण्याच्या समस्या वाढल्या आहेत. सध्या जलाशयांमध्ये बऱ्यापैकी पाणी आहे. हिप्परगी जलाशयामध्ये 1.06 टीएमसी इतका साठा आहे तर मलप्रभा जलाशयामध्ये 5.6 टीएमसी, अलमट्टी जलाशयामध्ये 5.1 टीएमसी पाणीसाठा असून तो जून अखेरपर्यंत होऊ शकतो. पावसाला सुरुवात झाली असून यावर्षी मान्सूनही जूनच्या पहिल्या आठवड्यात दाखल होण्याची शक्यता आहे. त्यामुळे घाबरण्याचे काहीच कारण नाही, असे त्यांनी सांगितले. महाराष्ट्रातून पाणी सोडण्याबाबत विचारले असता राजापूर बॅरेजमधून 1 टीएमसी पाणी सध्या सोडण्यात आले आहे. अधिक पाण्याची आवश्यकता भासल्यास महाराष्ट्र सरकारशी कर्नाटक सरकार चर्चा करणार आहे. याबाबत मी सरकारकडेही पाठपुरावा केला असून सद्यपरिस्थिती पाहूनच निर्णय घेतला जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. अनेक गावांमध्ये कूपनलिका तसेच विहिरींच्या खोदाईबाबत यापूर्वीच सूचना देण्यात आल्या आहेत. जलजीवन मिशन योजनेंतर्गत काही गावांना पाणीपुरवठा होत आहे. त्यामुळे पाण्याची समस्या गंभीर बनणार नाही, असे त्यांनी यावेळी सांगितले.









