महानगरपालिकेच्या बैठकीत निर्णय : के. के. कोप्प येथील मनपाच्या जागेचा पर्याय
बेळगाव : शहरात मोकाट कुत्र्यांचा प्रश्न गंभीर बनला असल्याने के. के. कोप्प येथील महापालिकेच्या जागेत कुत्र्यांसाठी शेल्टर उभारण्याचा ठराव गुरुवारी महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत पारित करण्यात आला. याबाबत जिल्हाधिकाऱ्यांकडे लवकरच प्रस्ताव पाठविला जाणार आहे. शेल्टर उभारल्यास त्या ठिकाणी शहरातील मोकाट कुत्री ठेवली जाणार असल्याने भविष्यात कुत्र्यांचा प्रश्न मार्गी लागण्यास मदत होणार आहे. गेल्या काही वर्षांपासून शहर व उपनगरात कुत्र्यांची पैदास मोठ्या प्रमाणात वाढत आहे. महापालिकेच्या पशुसंगोपन विभागाकडून कुत्र्यांची धरपकड केली जात आहे. पकडलेली कुत्री श्रीनगर येथील अॅनिमल बर्थ कंट्रोल सेंटरमध्ये नेली जात आहेत. त्या ठिकाणी कुत्र्यांचे निर्बिजीकरण करण्यात येत असून शस्त्रक्रिया झाल्यानंतर ज्या ठिकाणाहून कुत्री पकडण्यात आली होती, त्या ठिकाणी पुन्हा त्यांना नेऊन सोडले जात आहे. निर्बिजीकरण केले जात असले तरीदेखील कुत्र्यांची पैदास पुन्हा होतच आहे, असा सवाल यापूर्वी झालेल्या आरोग्य स्थायी समितीच्या बैठकीत करण्यात आला होता. त्यामुळे निर्बिजीकरण शस्त्रक्रियेवरच आता प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
विविध ठिकाणी कुत्र्यांचे कळप मोठ्या प्रमाणात फिरत असले तरी त्यांचा व्यवस्थितरित्या बंदोबस्त होत नसल्याचा आरोप आहे. मोकाट कुत्र्यांकडून आबालवृद्ध तसेच महिलांचा चावा घेतला जात आहे. चालू वर्षातील सहा महिन्यात बेळगाव जिल्ह्यात 10 हजारहून अधिक जणांना श्वानदंश झाला आहे. तर पाच जणांचा मृत्यू झाला आहे. दररोज या ना त्या ठिकाणी कुत्र्यांच्या हल्ल्यात जखमी होण्याच्या घटना घडत आहेत. तरी देखील महापालिकेला याचे गांभीर्य नसल्याचे दिसून येत आहे. दरवेळी महापालिकेच्या बैठकांमध्ये कुत्र्यांच्या समस्येवर केवळ चर्चाच केली जाते. पण प्रत्यक्षात कोणत्याच ठोस उपाययोजना हाती घेतल्या जात नाहीत. त्यामुळे गुरुवारी महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत नगरसेवक नितीन जाधव यांनी कुत्र्यांसाठी के. के. कोप्प येथे महापालिकेच्या जागेत शेल्टर उभारण्यात यावे, जेणेकरून कुत्र्यांची समस्या दूर होण्यास मदत होईल, अशी मागणी केली. त्यामुळे महापौर मंगेश पवार यांनी सदर मागणी पारित केली. याबाबत अंमलबजावणी करण्याची सूचना मनपा आयुक्त शुभा बी. यांना देण्यात आली. याबाबत लवकरच जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा करून कार्यवाही केली जाईल, असे आश्वासन आयुक्तांनी बैठकीत दिले.









