मंत्री प्रियांक खर्गे यांची माहिती : निर्णयाबद्दल आश्चर्य
प्रतिनिधी/ बेंगळूर
काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्या कुटुंबातील सिद्धार्थ विहार ट्रस्टला कर्नाटक औद्योगिक क्षेत्र विकास मंडळाकडून (केआयएडीबी) मिळालेली 5 एकर जमीन परत करण्याचा निर्णय खर्गे कुटुंबाने घेतला आहे. मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या पत्नी पार्वती यांनी मुडा येथील 14 भूखंड परत केल्यानंतर बेंगळूरच्या एरोस्पेस पार्कमधील 5 एकर जमीन केआरएडीबीला परत करण्याचा खर्गे कुटुंबाने घेतलेल्या निर्णयाबद्दल आश्चर्य व्यक्त होत आहे.
मल्लिकार्जुन खर्गे यांचा मुलगा राहुल खर्गे सिद्धार्थ विहार ट्रस्टचा अध्यक्ष आहे. या ट्रस्टला बेकायदेशीरपणे केआयएडीबीकडून 5 एकर जमीन देण्यात आली आहे. केआयएडीबीने नियमांचे उल्लंघन करून ही जमीन ट्रस्टला दिली आहे. जमीन मंजूर करताना नागरी सुविधा (सीए) भूखंडाचे वाटप करण्यात आले आहे, असा आरोप करून विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते चलवादी नारायणस्वामी यांनी राज्यपालांकडे तक्रार केली होती. या तक्रारीच्या पार्श्वभूमीवर राज्यपाल थावरचंद गेहलोत यांनी खर्गे कुटुंबाच्या ट्रस्टला सीए जमीन वाटप केल्याबद्दल स्पष्टीकरण देण्यासाठी मुख्य सचिव शालिनी रजनीश यांना पत्र लिहिले होते.
या सर्व घडामोडींमध्ये खर्गे कुटुंबाने जमीन परत करण्याचा निर्णय घेतला आहे. जमीन परत करण्याच्या निर्णयाची माहिती आयटी-बीटी आणि ग्रामविकास मंत्री प्रियांक खर्गे यांनी पत्रकारांना दिली. आम्ही ट्रस्टमध्ये बेकायदेशीरपणे जमीन संपादित केलेली नाही. तसेच ट्रस्टचा फायदा करण्याचा उद्देशही नाही. अनुसूचित जातीचे असूनही सवलतीच्या दरात जमीन मिळाली नाही. मात्र, राजकीय आरोप-प्रत्यारोपांना कंटाळून आम्ही जमीन परत करण्याचा निर्णय घेतला आहे. या ट्रस्टचे अध्यक्ष असलेल्या राहुल एम. यांनी केआयएडीबीच्या सीईओ यांना 20 सप्टेंबरला जमीन परत करण्याबाबत पत्र लिहिले आहे, असेही त्यांनी सांगितले.









