बेळगाव : मलप्रभा नदीवरील नविलतीर्थ जलाशयातून कालव्यात शुक्रवार दि. 22 सप्टेंबरपासून पुढील पंधरा दिवस पिण्याचे पाणी सोडण्याचा निर्णय मलप्रभा पाटबंधारे सल्लागार समितीच्या बैठकीत घेण्यात आला आहे. महिला व बालकल्याण खात्याच्या मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांनी ही माहिती दिली आहे. जिल्हाधिकारी कार्यालयात बुधवारी झालेल्या समितीच्या अध्यक्षपदावरून बोलताना पाटबंधारे व पिण्याचे पाणी या दोन्ही गोष्टी लक्षात ठेवून हा निर्णय घेण्यात आला आहे. सल्ला समितीच्या बैठकीतील निर्णयावर अधिकारी आदेश जारी करणार आहेत. शुक्रवारपासून पुढील पंधरा दिवस पाणी सोडण्यात येणार आहे, असेही त्यांनी सांगितले. आमदार एन. एच. कोनरे•ाr म्हणाले, पावसाअभावी पाण्याची समस्या निर्माण झाली आहे. त्यामुळे मलप्रभा नदीकाठावर नागरिकांना त्रास होतो आहे. त्यांच्या समस्या निवारण्यासाठी पाणी सोडण्याची नितांत आवश्यकता आहे. पाटबंधारे योजनांसाठी आवश्यक पाणी धरणात ठेवून पिण्याचे पाणी सोडण्याचा सल्ला त्यांनी दिला.
सरकारने दुष्काळ जाहीर केल्यामुळे परिस्थिती लक्षात घेऊन पिण्यासाठी टप्प्याटप्प्याने पाणी सोडता येणार आहे. याचाही विचार व्हावा, असा सल्ला त्यांनी दिला. सौंदत्तीचे आमदार विश्वास वैद्य यांनीही पावसाअभावी निर्माण झालेल्या पाणी समस्येकडे लक्ष वेधले. जनावरे आणि नागरिकांसाठी पिण्याच्या पाण्याचा प्रश्न आतापासूनच उद्भवला आहे. पिण्याच्या पाण्याची समस्या दूर करण्यासाठी त्वरित उपाययोजना करण्याची मागणी करतानाच नविलतीर्थ धरणातून पाणी सोडण्याची विनंती त्यांनी केली. विधान परिषद सदस्य चन्नराज हट्टीहोळी यांनी जनावरे व नागरिकांसाठी पिण्याचे पाणी पुरविणे अनिवार्य आहे. त्यामुळे प्राधान्यक्रमाने सध्या पाणी सोडण्याचा सल्ला दिला. जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी पुढीलवर्षीच्या जूनपर्यंतचा हिशेब लक्षात ठेवून पाण्याचे नियोजन करावे लागणार आहे. त्यामुळे सल्ला समितीने हे सर्व मुद्दे लक्षात ठेवून निर्णय घ्यावा, असे म्हणाले. यावेळी मुख्य अभियंते अशोक, सल्ला समितीचे सदस्य सचिव व्ही. एस. मधुकर, सदुगौडा पाटील, जिल्हा पोलीसप्रमुख डॉ. भीमाशंकर गुळेद व पाटबंधारे विभागाचे अधिकारी उपस्थित होते.









