वृत्तपत्र विक्रेता संघाची वार्षिक सभा खेळीमेळीत
बेळगाव : ई-पेपर, पोर्टल, युट्यूब यामुळे वृत्तपत्र वाचणाऱ्यांची संख्या घटत आहे. त्यामुळे वाचन संस्कृती लोप पावत आहे. याचा परिणाम वृत्तपत्र विक्रेत्यांच्या व्यवसायावर होत आहे. यावर अनेक कुटुंबे अवलंबून आहेत. वाचन संस्कृती शाबूत ठेवण्यासाठी वृत्तपत्र वाचन संस्कृती वाढविण्यासाठी प्रयत्न करण्याचा निर्णय वृत्तपत्र विक्रेता संघाच्या वार्षिक बैठकीमध्ये घेण्यात आला. पी. बी. रोड येथील कमलपुष्प मंगल कार्यालयात वृत्तपत्र विक्रेता संघाची वार्षिक बैठक संपन्न झाली. या बैठकीत अनेक विषयांवर चर्चा करून महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. या कार्यक्रमाला विविध वृत्तपत्रांचे प्रमुख उपस्थित होते. सध्याच्या डिजिटलायझेशन जगामध्ये प्रत्येक जण ऑनलाईनवर गुंतून आहे. त्यामुळे वृत्तपत्र वाचणाऱ्यांची संख्या कमी होत आहे. वाचन संस्कृती वाचविण्यासाठी प्रयत्न करणे काळाची गरज आहे. पेपरची विक्री वाढविण्यासाठी शाळा, महाविद्यालयांमध्ये जागृती मोहीम राबविण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला.
वृत्तपत्रांमधून शालेय विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणारे लेख तसेच विद्यार्थ्यांच्या यशाच्या बातम्या प्रसिद्ध होणे गरजेचे आहे, असे मत विक्रेत्यांकडून व्यक्त करण्यात आले. याबरोबरच वाचन संस्कृती वाढविण्यासाठी मोफत पेपर देण्याचा निर्णयही घेण्यात आला. तसेच सामाजिक बांधिलकी राखण्यासाठी रक्तदान व स्वच्छता मोहीम असे उपक्रम राबविण्याचा निर्णयही बैठकीमध्ये घेण्यात आला. यावेळी संघाचे अध्यक्ष प्रताप भोसले, सेक्रेटरी विशाल देशपांडे यांच्यासह मान्यवरांनी विचार व्यक्त केले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून महेश विजापुरे उपस्थित होते. विविध वृत्तपत्रांचे कार्यकारी अधिकारी उपस्थित होते. तसेच संघाचे उपाध्यक्ष कदम, पदाधिकारी आनंद गरडे, राजू भोसले, संजू घोरपडे, सतीश नाईक, सागर हजगोळकर, राजू निलजकर, दीपक राजगोळकर, सुभाष गोरे, गोपी आदी उपस्थित होते.









