बेळगाव : शहरातील भाजी विक्रेते आणि फेरीवाल्यांकडून भूभाडे वसूल करण्याचा ठेका देण्यासाठी निविदा मागविण्याचा निर्णय बुधवारच्या महापालिकेतील अर्थ व कर स्थायी समिती बैठकीत घेण्यात आला. यापूर्वी 1 ते सव्वालाख रुपये अनामत रक्कम घेण्यात येत होती. मात्र लिलावात भाग घेणाऱ्या ठेकेदाराला यापुढे 10 लाख रुपयांची अनामत रक्कम ठेवावी लागणार आहे. लवकरच भूभाडे वसुलीसंदर्भात निविदा मागवून ठेकेदार निश्चित केला जाणार आहे. महानगरपालिकेच्या हद्दीत येणाऱ्या विविध भागांमध्ये भाजी विक्रेते आणि फळ विक्रेते व्यवसाय करतात.
त्यांच्याकडून महापालिका भूभाडे वसूल करते. भूभाडे वसुलीचा ठेका लिलावाच्या माध्यमातून ठेकेदाराला दिला जातो. मात्र गेल्या अनेक वर्षांपासून एकच ठेकेदार भूभाडे वसूल करत आहे. त्यामुळे भूभाडे वसूल करण्यासंदर्भात नवीन ठेकेदाराची नियुक्ती करण्यात यावी यासाठी महापालिकेने निविदा मागवावी, अशी मागणी केली जात होती. त्यानुसार महापालिकेकडून यापूर्वी तीनवेळा निविदा मागविण्यात आली. तरीदेखील निविदेला प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे जुनाच ठेकेदार भूभाडे वसूल करत आहे. भूभाडे वसुलीसाठी ठेकेदाराकडून वर्षाला 1 कोटी 23 लाख रुपये महापालिकेला दिले जातात, असे यावेळी बैठकीत सांगण्यात आले.
ठेका संपला असला तरी नवीन ठेकेदाराची नियुक्ती न झाल्याने जुन्या ठेकेदाराकडून दर महिन्याला पैसे भरून घेऊन भूभाडे वसूल करण्यास अनुमती दिली जात आहे. मात्र नवीन ठेकेदाराची नियुक्ती व्हावी यासाठी जुन्या ठेकेदाराला गत महिन्यात चलन देण्यात आले नाही, असे महसूल उपायुक्त रेश्मा तालिकोटी यांनी बैठकीत सांगितले. त्यावर महापालिकेचे आर्थिक नुकसान होऊ नये यासाठी संबंधित ठेकेदाराला चलन देऊन थकीत रक्कम भरून घ्यावी, अशी सूचना करण्यात आली. सदर प्रस्ताव महापालिका आयुक्तांकडे प्रलंबित असून तातडीने नवीन निविदा काढण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली.
10 लाखांची अनामत रक्कम घेणार
याबाबत महापालिका आयुक्तांशी चर्चा करून भूभाडे वसूल करण्यासंदर्भात निविदा काढली जाईल, असे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. ठेकेदाराची नियुक्ती करण्याऐवजी भूभाडे महापालिकेनेच वसूल करावे, अशी मागणी विरोधी गटनेते मुजम्मिल डोनी यांनी केली. मात्र हे शक्य नसल्याचे प्रशासन उपायुक्त उदयकुमार तळवार यांनी बैठकीत पटवून दिले. शहरातील चार वेंडींग झोन वगळता इतर भागात व्यवसाय करणाऱ्या व्यापाऱ्यांकडून भूभाडे वसूल करण्यासंदर्भात निविदा मागविण्यात यावी. मात्र लिलाव प्रक्रियेत भाग घेणाऱ्या ठेकेदाराकडून 10 लाख रुपयांची अनामत रक्कम ठेवून घेण्यासंदर्भातही महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला.









