आमदार विठ्ठल हलगेकर, आमदार चन्नराज हट्टीहोळी, राजू सिद्धाणी इच्छुक : तीन इच्छुकांपैकी एकाची निवड करणार : यशवंत बिरजे यांची माहिती
खानापूर : बेळगाव जिल्हा मध्यवर्ती बँकेची निवडणूक ऑक्टोबर महिन्यात होणार आहे. यासाठी तालुक्यात डीसीसीचे सध्याचे संचालक अरविंद पाटील यांनी जोरदार मोर्चेबांधणी सुरू केली आहे. मात्र तालुक्यातील पीकेपीएस बँकांची अवस्था पाहता तसेच गलिच्छ आणि सुडाच्या राजकारणामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. यासाठी अरविंद पाटील यांच्या विरोधात निवडणूक लढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आमदार चन्नराज हट्टीहोळी, आमदार विठ्ठल हलगेकर आणि राजू सिद्धाणी हे तीन इच्छुक उमेदवार आहेत. या तिघांपैकी एकाची निवड उमेदवार म्हणून करण्यात येणार आहे. यासाठी निवड कमिटीची स्थापना करण्यात आली आहे, अशी माहिती यशवंत बिरजे यांनी पत्रकार परिषदेत बोलताना दिली. यावेळी आमदार चन्नराज हट्टीहोळी, आमदार विठ्ठल हलगेकर, राजू सिद्धाणी, मृणाल हेब्बाळकर, लक्ष्मण कसर्लेकर, के. पी. पाटील यासह पीकेपीएसचे अध्यक्ष, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
डीसीसी बँकेची निवडणूक ऑक्टोबर महिन्यात होणार आहे. यासाठी तालुक्यात जोरदार मोर्चेबांधणी सुरू झाली आहे. गेल्या वीस वर्षापासून संचालक म्हणून काम पहात असलेले अरविंद पाटील यांच्या कार्यपद्धतीमुळे तालुक्यातील शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. मागील निवडणुकीतही आम्ही शेतकऱ्यांचे हित डोळ्यासमोर ठेवून निवडणूक लढविली होती. मात्र अरविंद पाटील यांच्या कार्यपद्धतीत कोणतीही सुधारणा झाली नाही. सुडाचे राजकारण तसेच वैयक्तिक आकसापोटी अनेक पतसंस्थांची पत अडवून ठेवण्यात आली आहे. त्यामुळे संचालक मंडळाचे नुकसान न होता सामान्य शेतकऱ्याला शासनाकडून मिळणाऱ्या सोयीसुविधांपासून मुकावे लागले आहे. याचा परिणाम शेतकऱ्यांच्या वैयक्तिक विकासावर झाला आहे. यासाठी येत्या निवडणुकीतही अरविंद पाटील यांच्या विरोधात निवडणूक लढवण्याचा निर्णय घेण्यात आला असून निवड कमिटीचीही स्थापना करण्यात आली आहे. तीन उमेदवारातील एकाची निवड येत्या आठ-दहा दिवसात जाहीर करण्यात येणार असून जाहीर झालेल्या उमेदवारांच्या पाठिशी सर्व कमिटीच्या आणि इच्छुक उमेदवारांनी प्रचार करण्याचा निर्णय घेतला आहे, अशी माहिती यशवंत बिरजे यांनी दिली.
यावेळी आमदार विठ्ठल हलगेकर म्हणाले, सुडाचे राजकारण करून सहकार क्षेत्रात कधीच सामान्य लोकांना मदत होत नसते. मी आमदार म्हणून निवडून आल्यानंतर तालुक्यातील सहकारक्षेत्रात लक्ष घालू नये, असे मला वरिष्ठांकडून सांगण्यात आले. त्यानंतर मी गेल्या दोन वर्षात तालुक्यातील सहकार क्षेत्रातील संघ संस्थांच्या, बँकांच्या निवडणुका झाल्या. मात्र मी याच्यात अजिबात लक्ष घातलेले नाही. मी माझा दिलेला शब्द पाळत आलेलो आहे. मात्र माजी आमदार अरविंद पाटील यांनी वेळोवेळी पुढील आमदार मीच, तसेच माझ्याबद्दल अनेक ठिकाणी अपप्रचार तसेच अपशब्द वापरलेले आहेत. मी सहकार क्षेत्रात मोठे काम केले असून तालुक्यात महालक्ष्मी ग्रुपच्या माध्यमातून सहकार घराघरात पोहचवलेला आहे. मी स्वत: एका पीकेपीएसचा संचालक आहे. नुकताच पीकेपीएसच्या संचालकांची बैठक घेऊन निवडणुकीच्या प्रचाराची घोषणा केली होती. मात्र मी आमदार तसेच एक मतदार असूनदेखील मला या बैठकीला पाचारण करण्यात आले नाही. मागील निवडणुकीतही आम्ही एकजुटीने टक्कर दिली होती. आता मी चन्नराज हट्टीहोळी आणि राजू सिद्धाणी असे आम्ही तिघेजण इच्छूक आहोत. यापैकी एकाची उमेदवार म्हणून निवड करण्यात येणार आहे. आम्ही कोणत्याही परिस्थितीत ही निवडणूक निश्चित जिंकून दाखवू, कारण तालुक्यात बदलाचे वारे वाहत आहेत. यावेळी राजू सिद्धाणी यांनीही संचालक अरविंद पाटील यांच्या कार्यपद्धतीवर ताशेरे ओढत तालुक्यातील शेतकऱ्यांची अवस्था बिकट बनल्याचे सांगितले.









