दोनवेळा नोटीस बजावूनही बीव्हीजीकडून प्रतिसाद नाही
बेळगाव ; शहरातील कचऱ्याची उचल करण्यासाठी महापालिकेने निविदा काढल्या होत्या. या निविदा प्रक्रियेत पात्र ठरलेल्या बीव्हीजी कंपनीला काम देण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यानुसार काम करण्याची सूचना केली आहे. मात्र कंपनीकडून बँक गॅरंटी देण्यात आली नसल्याने वर्क ऑर्डर देण्यात आली नाही. तसेच दोनवेळा नोटीस बजावूनही कंपनीकडून महापालिकेला कोणताच प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे महापालिकेला नव्याने निविदा काढाव्या लागण्याची शक्यता आहे. शहरातील कचऱ्याची उचल करून तुरमुरी डेपोत नेण्यासाठी महापालिकेने निविदा काढल्या होत्या. या निविदा प्रक्रियेत बीव्हीजी कंपनी पात्र ठरली होती. सदर कंपनीला काम देण्याचा निर्णय घेऊन शुभारंभदेखील करण्यात आला. मात्र कंपनीकडून बँक गॅरंटी देण्यात आली नसल्यामुळे वर्क ऑर्डर देण्यात आली नाही. बँक गॅरंटी देण्यासाठी महापालिकेकडून कंपनीला पत्र पाठविण्यात आले. तरीदेखील कोणताच प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे स्वच्छतेचे काम करण्याबाबत बीव्हीजी कंपनी इच्छुक नसल्याचे निदर्शनास आले आहे. कंपनीने निविदा प्रक्रियेसाठी 20 लाख रुपये अनामत रक्कम भरली आहे. बँक गॅरंटी देऊन काम सुरू करावे, अन्यथा निविदा रद्द करून अनामत रक्कम जप्त करण्यात येईल, अशी नोटीस महापालिकेने बीव्हीजी कंपनीला बजावली होती. पहिली नोटीस देऊनदेखील कोणताच प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे महापालिकेने दुसऱ्यांदा नोटीस बजावून सात दिवसांची मुदत दिली होती. पण त्या दिलेल्या मुदतीतदेखील कंपनीकडून महापालिकेला कोणतेच उत्तर मिळाले नाही. त्यामुळे आता तिसऱ्यांदा नोटीस बजावून रक्कम जप्त करण्याचा विचार महापालिकेने चालविला आहे.
पुन्हा तीन महिन्यांचा कालावधी वाया जाण्याची शक्यता
सदर कंत्राटदाराने काम करण्यास तयारी दर्शविली नसल्यास निविदा प्रक्रिया रद्द करून नव्याने निविदा काढावी लागणार आहे. महापालिकेने यापूर्वी 20 पॅकेज करून निविदा काढल्या होत्या. पण अलिकडे काढलेल्या निविदा प्रक्रियेत पाच पॅकेज केले आहेत. मात्र या पाच पॅकेजच्या निविदेच्या अटींची पूर्तता स्थानिक स्वच्छता कंत्राटदारांना करता येत नाही. तसेच अन्य स्वच्छता कंत्राटदार निविदा प्रक्रियेत सहभाग घेत नाहीत. त्यामुळे महापालिकेची गोची झाली आहे. काढलेली निविदाप्रक्रिया रद्द केल्यास पुन्हा निविदा काढण्यासाठी पॅकेजमध्ये बदल करावा लागणार आहे. पुन्हा दहा किंवा वीस पॅकेज करून वेगवेगळे इस्टीमेट करावे लागणार आहे. त्यामुळे महापालिकेची डोकेदुखी वाढणार आहे. ही प्रक्रिया पूर्ण करण्यास पुन्हा तीन महिन्यांचा कालावधी वाया जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे बीव्हीजी कंपनीलाच काम देण्यासाठी मनपाने अटापीटा चालविल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.









