चेंगराचेंगरी प्रकरण : 12 जूनपूर्वी बंद लखोट्यात अहवाल सादर करण्याची उच्च न्यायालयाची सरकारला सूचना
बेंगळूर : आरसीबीच्या विजयोत्सवावेळी बेंगळूरच्या चिन्नास्वामी स्टेडियमबाहेर झालेल्या चेंगराचेंगरीच्या घटनेत 11 चाहत्यांना जीव गमवावा लागला होता. या घटनेससंबंधी उच्च न्यायालयाने स्वत: दाखल केलेल्या याचिकेवर मंगळवारी सुनावणी झाली. यावेळी न्यायालयाने सरकारकडून प्रतिक्रिया आल्यानंतर अंतरिम अर्जांवर निर्णय घेतला जाईल, असे सांगून कोणतेही निर्देश न देता सुनावणी 12 जूनपर्यंत पुढे ढकलली.
दुघटनेनंतर कोणतेही खटले दाखल झाले नव्हते. त्यामुळे उच्च न्यायालयाने स्वत: जनहित याचिका दाखल करून घेतली होती. त्यानंतर अनेकांनी दाखल केलेल्या अंतरिम याचिकांवर सुनावणी विनंती झाल्याने मंगळवारी न्यायमूर्ती व्ही. कामेश्वर राव आणि न्यायमूर्ती सी. एम. जोशी यांच्या पीठाने सुनावणी केली. सरकारची प्रतिक्रिया दाखल झाल्यानंतर निर्णय घेण्यात येईल, असे स्पष्ट करत न्यायालयाने सुनावणी 12 रोजी दुपारी 2:30 पर्यंत लांबणीवर टाकली.
5 जून रोजी सुनावणीवेळी न्यायालयाने सरकारला चेंगराचेंगरीच्या घटनेचा संपूर्ण अहवाल सादर करण्याची सूचना दिली होती. अद्याप सरकारने कोणताही अहवाल दिलेला नाही. मंगळवारी सुनावणीवेळी न्यायालयाने सरकारकडून अद्याप अहवाल का सादर झाला नाही, अशी विचारणा केली. तेव्हा सरकारची बाजू मांडणारे अॅडव्होकेट जनरल शशिकिरण शेट्टी यांनी आम्ही न्यायालयीन चौकशीचे आदेश दिले आहेत. मॅजिस्ट्रेट तपास, न्यायालयीन तपास अहवाल सादर केला जाईल. तपासासंबंधी यापूर्वीच आदेश दिले आहेत. त्यामुळे एक महिन्याचा कालावधी द्यावा, अशी विनंती केली. मात्र 12 जूनपूर्वी बंद लखोट्यात अहवाल सादर करण्याची सूचना दिली.









