याबाबत पुढील न्यायालयाच्या आदेशानंतरच कार्यवाही होईल
कोल्हापूर : आधुनिक औषधशास्त्र प्रमाणपत्र अभ्यासक्रमाबाबत शासनाचा लवकरच सकारात्मक निर्णय होईल. याबाबत पुढील न्यायालयाच्या आदेशानंतरच कार्यवाही होईल, अशी माहिती वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली.
सीसीएमपी अभ्यासक्रम पूर्ण केलेल्या होमिओपॅथी डॉक्टर्सच्या महाराष्ट्र मेडिकल कौन्सिल अंतर्गत नोंदणीबाबत निर्गमित शासन आदेशबाबत मार्ड प्रतिनिधी सोबत झालेल्या बैठकीत ते बोलत होते.
मंत्री मुश्रीफ म्हणाले, संप, बंद पुकारल्यास राज्यातील आरोग्य व्यवस्था ठप्प होऊन रुग्णांची मोठ्या प्रमाणावर गैरसोय होईल. शासनाने संवादातून तोडगा काढण्याची भूमिका घेतलेली आहे. रुग्णसेवा सुरळीत ठेवण्याचे व्रत्त वैद्यकीय व्यवसायिकांनी घेतलेले असून शासनास सहकार्य करावे.
राज्य शासनाने विधी व न्याय विभाग तसेच महाधिवक्त्यांचा अभिप्राय घेतल्यानंतर सीसीएमपीला स्वतंत्र नोंदणी पुस्तक ठेवण्याचे निर्देश दिले आहेत. ही बाब आता न्यायप्रविष्ठ आहे. त्यामुळे न्यायालयाच्या निर्णयानुसार पुढील कार्यवाही करण्यात येईल, असे स्पष्ट केले.
या बैठकीला वैद्यकीय शिक्षण विभागाचे सचिव श्री. धीरजकुमार, आयुक्त अनिल भंडारी, संचालक, डॉ. अजय चंदनवाले, आयुष संचालक डॉ. रमण घुंगराळेकर तसेच इंडियन मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. संतोष कदम, सचिव डॉ. अनिल आव्हाड उपस्थित होते.








