गावडेंच्या वक्तव्यांची गंभीर दखल : सभेतील इशाऱ्यांचीही घेतलीय नोंद
पणजी : संस्कृतीमंत्री गोविंद गावडे यांनी केलेल्या वक्तव्याची पक्षश्रेष्ठींनी गंभीर दखल घेतली आहे. शिवाय फर्मागुडी येथे जी सभा घेऊन प्रदेश भाजप अध्यक्ष दामू नाईक तसेच मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांना जी आव्हाने देण्यात आली, त्याचीही पक्षश्रेष्ठींनी गंभीर दखल घेतलेली आहे. पुढील तीन दिवसांत त्याचे परिणाम दिसून येतील, अशी माहिती भाजपमधील नेत्यांकडून मिळाली असून याचाच अर्थ मंत्री गावडे यांच्यावरील कारवाई आता निश्चित आहे. गावडे यांच्या विरोधात कोणतीही कारवाई होत नाही. यामागे नेमकी कारणे काय, याचा शोध घेतला असता भाजपच्या नेत्यांकडून मिळालेल्या माहितीनुसार पक्षश्रेष्ठींनी या प्रकरणाची गंभीर दखल घेतली आहे. त्यानुसार मंत्री गावडे यांचे मंत्रीपद जाईल हे आता पुन्हा एकदा निश्चित झाले आहे.
प्रदेश भाजप अध्यक्ष दामू नाईक आणि मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या दरम्यान याविषयी सविस्तर चर्चा झाली आहे आणि त्यानंतर त्यांनी आपला अहवाल पक्षश्रेष्ठींना सादर केला आहे. मंत्री गावडे यांनी मागाहून काही सांगू द्या, परंतु त्यावेळी मात्र सभेमध्ये ते जे काही बोलले ते फार अत्यंत आक्षेपार्ह होते. त्याची दखल पक्षश्रेष्ठींनी घेतली आहे. गावडे यांच्या विरोधात शिस्तभंगाची कारवाई म्हणून त्यांचे मंत्रीपद काढून घेतले जाईल, असा अंदाज आहे. त्याचबरोबर आणखी दोन मंत्र्यांच्या जागी दोन नवे मंत्री येतील असा अंदाज आहे. एकंदरीत मंत्रिमंडळात तीन नवे मंत्री येतील. गावडे यांच्यावर कारवाई झाली नाही, तर इतर आमदारांचे फावणार असून ही मंडळी देखील अशाच पद्धतीने वागतील आणि त्यातून पक्षाच्या शिस्तीचा भंग होईल, असा अहवाल गोव्यातून दिल्लीला पोहोचलेला आहे. त्यामुळे आता पुढील दोन दिवसानंतर पक्षश्रेष्ठींचा आदेश येईल. त्यानंतर मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत हे मंत्रिमंडळाची फेररचना करतील.









