रालोआत मुख्यमंत्रीपदाचा चेहरा निश्चित नाही
वृत्तसंस्था/ पाटणा
बिहार विधानसभा निवडणुकीनंतर रालोआचा मुख्यमंत्रिपदाचा चेहरा कोण असणार हे अद्याप ठरलेले नाही. गृहमंत्री अमित शाह यांच्या वक्तव्यानंतर ही बाब स्पष्ट झाली आहे. बिहार निवडणुकीत रालोआ विजयी झाल्यास नितीश कुमार यांना मुख्यमंत्री करणार का असा प्रश्न शाह यांना एका मुलाखतीत विचारण्यात आला. यावर कुणाला मुख्यमंत्री करणारा मी कोण? निवडणुकीनंतर सर्व पक्ष एकजूट होतील, विधिमंडळ गटाचे नेते स्वत:चा निर्णय घेतील असे उत्तर शाह यांनी दिले. परंतु रालोआ नितीश कुमार यांच्याच नेतृत्वात निवडणूक लढवत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. नितीश कुमारांवर केवळ भाजपचा नव्हे तर पूर्ण बिहारचा विश्वास आहे. मुख्यमंत्री कोण होणार याचा निर्णय विधिमंडळ गटाचे नेते परस्परांसोबत चर्चा करून घेतील असे म्हणत शाह यांनी साशंकता वाढविली आहे.
निवडणुकीपूर्वी ठरवा : मांझी
शाह यांच्या या वक्तव्यानंतर राजकीय वातावरण तापले असून काँग्रेसने नितीश कुमार मुख्यमंत्री होणार नसल्याची पोस्ट सोशल मीडियावर केली आहे. अमित शाह हे रालोआच्या प्रमुख नेत्यांपैकी एक असून त्यांचे म्हणणे अधिकृतच मानले जाईल. परंतु निवडणुकीपूर्वी मुख्यमंत्री पदाचा चेहरा निश्चित व्हायला हवा असे माझे मत आहे. मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी अलिकडेच नाराजी व्यक्त केली होती, परंतु आता सर्व ठीक झाले आहे. आघाडीत सर्वकाही सुरळीत झाले असल्याची टिप्पणी हम या पक्षाचे अध्यक्ष आणि केंद्रीय मंत्री जीतनराम मांझी यांनी केली आहे.
मुख्यमंत्री नितीश कुमार हेच चेहरा
गृहमंत्री अमित शाह यांनी शुक्रवारी सकाळी मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या निवासस्थानी जात त्यांची भेट घेतली होती. बिहार निवडणुकीतील पुढील प्रचार रणनीतिवरून या दोन्ही नेत्यांमध्ये विस्तृत चर्चा झाली आहे. निवडणुकीला आता फारच कमी वेळ असल्याने अनेक मुद्द्यांवर चर्चा झाली. रालोआत कुठलीच गडबड नाही. सर्वकाही ठीक असून आम्ही एकजूट आहोत. मुख्यमंत्री नितीश कुमार हेच रालोआचे चेहरे आहेत असे संजदच्या कार्यकारी अध्यक्षाने सांगितले आहे.
बिहारमध्ये जंगलराज परतणार नाही
अमित शाह यांनी शुक्रवारी छपरा येथील तरैया येथे जनसभेला संबोधित केले. बिहारमध्ये यावेळी रालोआला ऐतिहासिक विजय मिळणर आहे. केंद्रात असो किंवा राज्यात लालूप्रसाद यादव हे जेथे सत्तेवर राहिले, त्यांनी तेथे मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार केला. 21 व्या शतकातील बिहारची जनता कधीच लालूप्रसादांचे जंगलराज परत आणणार नाही. लालूप्रसाद यादवांनी रस्ते, पूल, पाणी, घरांच्या मुद्द्यावर चर्चा करणे त्यांनाच शोभा देत नाही. लालूप्रसादांनी केवळ स्वत:चे जंगलराज, अपहरण, खंडणीवसुलीवर चर्चा करावी अशी उपरोधिक टीका शाह यांनी केली आहे.
रालोआत जागावाटप
बिहारमध्ये रालोआचे जागावाटप झाले असून भाजप आणि संजद प्रत्येकी 101 जागा लढविणार आहे. लोकजनशक्ती पक्षाकरता 29 जागा सोडण्यात आल्या आहेत. तर उपेंद्र कुशवाह यांच्या राष्ट्रीय लोकमोर्चाला 6 जागा मिळाल्या आहेत. हिंदुस्थानी अवाम मोर्चा या मांझी यांच्या पक्षालाही 6 जागा लढविता येणार आहेत. संजदच्या वाट्याच्या काही जागा लोजपला गेल्याने नितीश कुमार हे नाराज असल्याची चर्चा प्रारंभी होती. यातूनच शाह यांनी त्यांची भेट घेतली असल्याचे मानले जात आहे.









