प्रवीण देसाई,कोल्हापूर
वन्यप्राण्यांच्या हल्ल्यामध्ये मृत्यू झालेल्यांच्या वारसांना 25 लाख ऊपये अर्थसहाय्य देण्याचा महत्वपूर्ण निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात कायमस्वरूपी अपंगत्व आल्यास 7 लाख 50 हजार रूपये, गंभीर जखमी झाल्यास 5 लाख रूपये व किरकोळ जखमी झाल्यास 50 हजार रूपये दिले जाणार आहेत. या निर्णयाची अंमलबजावणी करावी, असे निर्देश सरकारकडून जिल्हा प्रशासनाला दिले आहेत.
वन्यप्राण्यांच्या हल्ल्यामुळे मनुष्यहानीच्या अनेक घटना घडल्या आहेत. या पार्श्वभूमीवर बाधितांना तत्काळ नुकसान भरपाई देण्याचे राज्य सरकारच्या विचाराधीन होते. याबाबत लोकप्रतिनिधींकडूनही वारंवार पाठपुरावा केला जात होता. त्या पार्श्वभूमीवर सरकारने अर्थसहाय्य देण्याचा महत्वपूर्ण निर्णय घेतला. त्यानुसार हत्ती, वाघ, बिबट्या, अस्वल, गवा रेडा, रानडुक्कर, लांडगा, कोल्हा, तरस, रानकुत्रे, निलगाय, मगर, माकड, वानरांच्या हल्ल्यात मनुष्याचा मृत्यू झाल्यास त्याच्या वारसांना 25 लाख ऊपये अर्थसहाय्य दिले जाणार आहे. यातील 10 लाख रूपयांचा धनादेश तत्काळ दिला जाणार आहे. उर्वरीत 10 लाख रूपये 5 वर्षांसाठी फिक्स डिपॉझिट तर 5 लाख ऊपये 10 वर्षांकरीता फिक्स डिपॉझिटमध्ये ठेवावे. एकंदरीत 10 वर्षानंतर वारसांना पूर्ण रक्कम ताब्यात मिळणार आहे.
वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात जखमी झालेल्यांना तातडीने औषधोपचार मिळावेत, यासाठी 5 लाख रूपये अर्थसहाय्य व किरकोळ जखमींना औषधोपचारासाठी 50 हजार रूपये दिले जाणार आहे. कामयचे अपंगत्व आल्यास 7 लाख 50 हजार रूपये मिळणार आहेत. याची तत्काळ अंमलबजावणी करावी, असे निर्देश जिल्हा प्रशासनाला देण्यात आले आहेत. त्यानुसार अंमलबजावणीही सुरू होणार आहे.









