केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांचे स्पष्टीकरण
प्रतिनिधी/ बेंगळूर
यंदाच्या विधानसभा निवडणुकीनंतर नेतृत्त्वाचा निर्णय घेतला जाणार आहे. आम्ही यापूर्वीच तीन लिंगायत नेत्यांना मुख्यमंत्री केले आहे. त्यानुसार लिंगायत समाजावर प्रेम असल्यास राहुल गांधींनी लिंगायत उमेदवाराला मुख्यमंत्री करण्याची घोषणा करावी, असे आव्हान केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांनी दिले. हुबळीतील आपल्या निवासस्थानी पत्रकारांशी ते बोलत होते.
जोशी पुढे म्हणाले, लिंगायत मुख्यमंत्र्यांविषयी बोलताना सिद्धरामय्या यांनी लिंगायत मुख्यमंत्री भ्रष्टाचार करीत असल्याचे विधान केले होते. परंतु अद्याप त्यांनी माफी मागितलेली नाही. यापूर्वीच निवडणूक आयोगाकडे याबद्दल तक्रार दाखल करण्यात आली आहे. आम्ही बसवराज बोम्माई यांच्या मार्गदर्शनाखाली यंदाच्या निवडणुकीत उतरणार आहे, असे त्यांनी सांगितले.
29 रोजी मोदी कुडचीत
हुबळी-धारवाड सेंट्रल विधानसभा मतदारसंघात भाजप उमेदवाराचा मोठ्या फरकाने विजय होणार आहे. 29 एप्रिल रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी कुडची येथे येणार आहेत. यानंतर बेळगाव जिल्ह्यातील आणखी एका कार्यक्रमात सहभागी होण्याची विनंती आपण मोदींना केली आहे. उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथही राज्य दौऱ्यावर येणार आहेत. कित्तूर कर्नाटक भागात भाजपचा प्रभाव चांगला आहे. आम्ही उत्तराखंडमध्ये इतिहास मोडीत काढत सत्तेवर आलो आहोत, असेही प्रल्हाद जोशी यांनी स्पष्ट केले.
यावेळी स्वबळावर भाजप सत्तेवर येणार आहे. गेल्या दोनवेळा आम्ही स्वबळावर सत्तेत आलो नाही. जगदीश शेट्टर यांनी पक्ष सोडल्यामुळे काहीही परिणाम झालेला नाही. जुना खेळाडू निवृत्त झाला आहे, पण तो दुसऱ्या संघात खेळायला गेला आहे. यावेळी चषक आमचाच असल्याचा टोला त्यांनी शेट्टर यांना लगावला.
लिंगायत समाज हे भाजपचे हत्यार आहे, या विधानावर प्रतिक्रिया देताना, लिंगायत समाज हे आमच्यासाठी हत्यार नाही. काँग्रेसने लिंगायतांचा अपमान केल्याचे त्यांनी सांगितले. बी. एल. संतोष यांच्यावर शेट्टर यांनी केलेल्या आरोपांवर प्रतिक्रिया देताना, अमित शहा, मोदींच्या पातळीवरचा हा निर्णय आहे. स्वत: अमित शहा यांनी जगदीश शेट्टर यांच्याशी संवाद साधला होता. नवीन पिढी यावी, आम्ही तुम्हाला मोठी जबाबदारी देण्याचे ठरविले आहे, असे सांगितले होते. परंतु त्यांनी याकडे दुर्लक्ष करून काँग्रेसमध्ये प्रवेश केला, असा आरोपही प्रल्हाद जोशी यांनी केला.









