पुणे / प्रतिनिधी :
इयत्ता बारावीच्या इंग्रजी विषयाच्या प्रश्नपत्रिकेत झालेली चूक मान्य असून, याबद्दल राज्य मंडळाच्या वतीने दिलगिरी व्यक्त करतो. अशा प्रकरणामुळे विद्यार्थी, शिक्षक व पालकांमध्ये मंडळाबद्दल असलेल्या विश्वासार्हतेला तडा गेल्याची कबुली मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी बुधवारी दिली. इंग्रजी विषयांच्या गुणांचा निर्णय मुख्य नियामकांच्या अहवालानंतर घेण्यात येईल. विद्यार्थ्यांचे नुकसान होणार नाही, असेही गोसावी यांनी स्पष्ट केले.
याबाबत बोलताना गोसावी म्हणाले, बारावीच्या पहिल्याच इंग्रजी विषयाच्या प्रश्नपत्रिकेत प्रश्नांऐवजी उत्तर छापून आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. असे प्रकार वारंवार घडत आहेत. त्यामुळे मंडळाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. परीक्षेस प्रविष्ट झालेल्या विद्यार्थ्यांच्या मनावर याचा विपरित परिणाम होत आहे. बारावीच्या इंग्रजी विषयाच्या प्रश्नपत्रिकेत झालेली चूक मान्य आहे. अशा वारंवार घडणाऱ्या घटनांमुळे मंडळाची विश्वासार्हता राहत नाही. या चुकांमुळे विद्यार्थ्यांचे नुकसान होणार नाही, याची पुरेपूर काळजी घेतली जाईल. इंग्रजीच्या मुख्य नियामकांचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर निर्णय घेण्यात येईल.
अधिक वाचा : दहावीच्या परीक्षेला उद्यापासून सुरुवात; राज्यभरातून 15.77 लाख विद्यार्थी देणार परीक्षा
चूक छपाईत की संपादनात हे लवकरच कळेल
प्रश्नपत्रिकेत चूक होणार नाही, यासाठी मंडळाकडून विशेष खबरदारी घेतली जात असते. त्याची मोठी प्रक्रिया आहे. प्रश्नपत्रिका छपाईला गेल्यानंतर त्याची गोपनीयता संपते. इंग्रजी प्रश्नपत्रिकेतील चूक ही छपाईची की संपादनाची हे लवकरच समोर येईल. जर छपाईची चूक असेल, तर संबंधित मुद्रणालयास मोठा दंड आकारण्याची तरतूद मंडळाच्या नियमावलीत असल्याचे गोसावी यांनी स्पष्ट केले.








