आरोग्यमंत्री दिनेश गुंडूराव यांची उपस्थिती : संचालक रमेश दोड्डण्णावर यांची माहिती
बेळगाव : गुड्सशेड रोड रेल्वे ओव्हरब्रिजजवळील डेक्कन मेडिकल सेंटर रौप्यमहोत्सवी वर्षात पदार्पण करत असून त्या निमित्ताने मंगळवार दि. 14 रोजी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी 10 वाजता हॉस्पिटलच्या परिसरात कार्यक्रम होणार असून याला राज्याचे आरोग्यमंत्री दिनेश गुंडूराव उपस्थित राहणार असल्याची माहिती संचालक रमेश दोड्डण्णावर यांनी सोमवारी आयोजित पत्रकार परिषदेत दिली. 25 वर्षांपूर्वी एका लहानशा क्लिनिकपासून डेक्कन मेडिकल सेंटरचा प्रवास सुरू झाला. मागील 25 वर्षांत उत्तर कर्नाटक, पश्चिम महाराष्ट्र व कोकणातील हजारो रुग्णांवर यशस्वीरीत्या उपचार करण्यात आले आहेत.
सध्या शंभर खाटांचे सुसज्ज हॉस्पिटल असून सहा अत्याधुनिक क्रिटिकल केअर युनिट तसेच दोन मॉड्युलर ऑपरेशन थिएटर सुरू आहेत. हृदयरोग, मधुमेह, अस्थिरोग, शस्त्रक्रिया, स्त्राrरोग, मूत्रविकार, बालरोग यासह इतर सेवा हॉस्पिटलमध्ये दिल्या जात आहेत. सर्व विभागांना इनहाऊस फार्मसी, डायग्नोस्टिक लॅब, एनआयसीयू आणि कार्डियाक केअर युनिट रुग्णांना उत्तमोत्तम उपचार देत आहेत. मंगळवारी होणाऱ्या कार्यक्रमाला पालकमंत्री सतीश जारकीहोळी, महिला व बालकल्याण मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर, कर्नाटक राज्याचे दिल्ली येथील विशेष प्रतिनिधी प्रकाश हुक्केरी, आमदार गणेश हुक्केरी, केएलईचे चेअरमन डॉ. प्रभाकर कोरे उपस्थित राहणार असल्याचे सांगण्यात आले. पत्रकार परिषदेवेळी डॉ. सावित्री दोड्डण्णावर, विनोद दोड्डण्णावर, राज दोड्डण्णावर यासह इतर उपस्थित होते.
विविध आरोग्य योजनांसाठी प्रयत्नशील
हॉस्पिटलमधील बेडची संख्या वाढवून आता शंभर करण्यात आली आहे. भरतेश नर्सिंग कॉलेज तसेच भरतेश होमिओपॅथिक कॉलेजमधील तज्ञ डॉक्टरांना या ठिकाणी पाचारण केले जाते. भविष्यात कर्नाटक सरकारच्या विविध आरोग्य योजना हॉस्पिटलमध्ये सुरू करण्यासाठी आपण प्रयत्नशील आहोत, असे डॉ. रमेश दोड्डण्णावर यांनी सांगितले.









