वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
महिला क्रिकेट पंच वृंदा राठी, जननी नारायणन आणि गायत्री वेणुगोपालन यांनी आपल्या पंचगिरी क्षेत्राला रणजी स्पर्धेतून प्रारंभ केला आहे. रणजी स्पर्धेच्या इतिहासात पहिल्यांदाच महिला पंचांची नियुक्ती करण्यात आली आहे.

वृंदा राठी ही भारताची माजी क्रिकेटपटू तसेच सॉफ्टवेअर इंजिनिअरही आहे. दुखापतीमुळे तिला आपल्या क्रिकेट कारकीर्दीला लवकरच पूर्णविराम द्यावा लागला होता. झारखंड आणि छत्तीसगड यांच्यातील जमशेदपूरमध्ये दुसऱया फेरीतील सामन्यात गायत्री वेणुगोपालन मैदानावर पंच म्हणून राहिल. तसेच सुरतमध्ये रेल्वे आणि त्रिपुरा यांच्यातील रणजी सामन्यात वृंदा राठी त्याचप्रमाणे पणजीमध्ये गोवा आणि पाँडिचेरी यांच्यातील सामन्यात जननी नारायणन मैदानावरील पंच राहणार आहेत. 36 वर्षीय जननी नारायणन या तामिळनाडू क्रिकेट संघटनेमार्फत आपल्या पंचगिरीला प्रारंभ केला आहे. तामिळनाडूच्या क्रिकेट संघटनेने आपल्या नियमामध्ये बदल करून महिला पंचांसाठी बीसीसीआयतर्फे पंचगिरी परीक्षा 2018 साली घेतली होती या परीक्षेत जननी नारायणन उत्तीर्ण झाल्या. 2021 साली नारायणने तामिळनाडू प्रिमियर लिग क्रिकेट स्पर्धेत पहिल्यांदा मैदानावर पंच म्हणून प्रवेश केला. मुंबईच्या 32 वर्षीय वृंदा राठी यांनी बीसीसीआयच्या पंच परीक्षा प्रथमश्रेणीमध्ये उत्तीर्ण झाल्या. त्यानंतर त्यांनी मुंबईतील अनेक स्थानिक सामन्यात पंचगिरी केली आहे. सध्या क्रिकेट क्षेत्रात नारायणन आणि राठी या अनुभवी पंच म्हणून ओळखल्या जातात.









