वाहनधारकांतून संताप : नवीन फलक उभारण्याकडे दुर्लक्ष
वार्ताहर /अगसगे
अगसगे-कडोली क्रॉसवर कोसळलेल्या दिशादर्शक फलकाकडे दुर्लक्ष झाल्याने वाहनधारकांची गैरसोय होऊ लागली आहे. कित्येक दिवसापासून नवीन दिशादर्शक फलक उभारण्याकडे सार्वजनिक बांधकाम खात्याने कानाडोळा केला आहे. त्यामुळे वाहनधारकांतून संतप्त प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. या फाट्यावर सार्वजनिक बांधकाम खात्यामार्फत दिशादर्शक फलक उभारण्यात आला होता. सुमारे सहा महिन्यापूर्वी काही समाजकंटकांनी हा फलक रात्रीच्या अंधाराचा फायदा घेऊन मोडतोड केल्याचा संशय व्यक्त होत आहे. त्यानंतर या फलकाविषयी कोणालाच गांभीर्य नसल्याचे दिसत आहे. त्यामुळे अद्याप हा फलक मोडलेल्या अवस्थेतच आहे. त्यामुळे नवीन वाहनधारकांची मोठी गैरसोय होऊ लागली आहे. अगसगे-हंदिगनूर व कडोली असे दोन फाटे येथून गेल्याने नवीन वाहनधारकांना कुठे जायचे, असा प्रश्न पडू लागला आहे. दिशादर्शक फलक पूर्णपणे कोसळून गेल्याने वाहनधारकांची गोची निर्माण होऊ लागली आहे. गैरसोय टाळण्यासाठी तातडीने या ठिकाणी नवीन दिशादर्शक फलक उभा करावा, अशी मागणी जोर धरू लागली आहे.
वाहनधारकांची अडचण
अगसगे फाट्याच्या दिशेने, खडीमशिन अगसगे, चलवेनट्टी, म्हाळेनहट्टी, हंदिगनूर, कुरीहाळ, बोडकेनहट्टी, राजगोळी तर कडोली फाट्याच्या दिशेने जाफरवाडी, कडोली, देवगेरी, गुंजेनहट्टी, मण्णीकेरी आदी गावांचा संपर्क आहे. त्यामुळे या मार्गावर दररोज मोठ्या संख्येने दळणवळण असते. शिवाय पुणे-बेंगळूर राष्ट्रीय महामार्गाला हा रस्ता जोडला गेला आहे. शिवाय एपीएमसी मार्केटमध्ये परराज्यातून येणाऱ्या अवजड वाहनांची संख्याही जास्त आहे. मात्र या ठिकाणी दिशादर्शक फलक नसल्याने वाहनचालकांना कोणत्या दिशेने जावे हेच कळेनासे झाले आहे. या फाट्यावर बांधकाम केलेला हा दिशादर्शक फलक आहे. मात्र, काही अज्ञात समाजकंटकांनी या फलकाची नासधूस केली आहे. या कृत्यामुळे तीव्र नाराजी व्यक्त होऊ लागली आहे. मागील सहा महिन्यापासून साधा फलकदेखील नसल्याने वाहनधारक मात्र अडचणीत येऊ लागले आहेत. तरी संबंधीत सार्वजनिक बांधकाम खात्याने या ठिकाणी नूतन बांधकामाचा फलक उभारावा, अशी मागणी वाहनधारकांतून होत आहे.









