कोल्हापूर :
शहराच्या उपनगरात बांधकामांची संख्या प्रचंड वाढली आहे. जुनी बांधकामे पाडून त्याठाकाणी नवीन टोलेजंग इमारती उभारल्या जात आहेत. मात्र पाडलेल्या खरमातीची योग्य विल्हेवाट लावली जात नाही. महापालिकेची रिकामी जागा दिसली की त्या ठिकाणी खरमाती टाकली जात आहे. यामुळे उपनगरात अनेक ठिकाणी असे ढिगारे दिसत असून विद्रुपीकरण येत आहे.
कोल्हापूर शहराची हद्दवाढ गेल्या अनेक वर्षात झाली नाही. सद्या शहराचा विस्तार थांबला आहे. यामुळे नवीन जागा आणि बांधकाम शहरात होऊ शकत नाही. जुने बांधकाम पाडून त्याठिकाणी नवीन इमारती उभारल्या जात आहेत. शहरातील जागा संपल्यामुळे लोकांनी शहराला लागूनच पण शहराच्या बाहेर असलेल्या उपनगराकडे आपला मोर्चा वळवला आहे. उपनगरातील फारसे अतिक्रमण नाही. यामुळे अजून तरी रस्ते रुंद दिसतात. सद्या उपनगरात खरमातीचे रिकाम्या जागा आणि ओढयाच्या काठावर टाकले जाणारे ढिगारे ही नवीन समस्या निर्माण होत आहे.

शहर असो किंवा उपनगर तेथील जुने बांधकाम पाडले किंवा नवीन बांधकाम करुन उर्वरित टाकाऊ खरमातीची योग्य ठिकाणी विल्हेवाट लावली जात नाही. संबंधित इमारतीच्या मालकाला या खरमातीचे देणेघेणे राहत नाही. त्यांने कुणाला तरी हे काम दिलेले असते. या व्यवसायात कर्नाटकातील ट्रॅक्टर चालकांची संख्या मोठी आहे. ते अशी खरमाती कुणाला भरावासाठी आवश्यक असेल तर विकतात अन्यथा रिकाम्या मैदानात टाकतात. राजेंद्रनगर रिंगरोडवरील मनोरा हॉटेलमागील रिकामे मैदान, डॉ.सर्वपल्ली राधाकृष्णन विद्यामंदिराशेजारील खासगी जागेत, एसएससी बोर्ड ते सम्राटनगर येथील बीएसएनएल टॉवर रस्त्यावरील ओढ्याच्या काठावर या उपनगरात मोठे ढिगारे दिसत आहेत. पावसाळयात ही खरमाती रस्त्यावर येणार आहे.
- पावसाळयात दलदल
खरमातीची खरी समस्या पावसाळयात उद्भवते. रस्त्याकडेला, महापालिकेच्या मालकीच्या रिकाम्या जागेत खरमाती टाकली जाते. यामुळे पाऊस सुरु झाला की ती खरमाती वाहून मुख्य रस्त्यावर येते. परिणामी दलदल होते. काही ठिकाणी या खरमातीमुळे पावसाचे पाणी तुंबून वाहतूक थांबते. पावसाळा पंधरा दिवसावर आला असून ही समस्या उद्भवण्याची शक्यता आहे. यामुळे महापालिकेने खरमाती टाकणाऱ्यावर कारवाई करण्याची मागणी त्या त्या परिसरातील नागरिकांतून होत आहे.
- ओढयातील गाळ काठावरच
पावसाळ्यापूर्वी महापालिकेकडून नाल्यांची सफाई करण्यात येत आहे. उपनगरातील नाल्यांची सफाई सुरु आहे. या नाल्यात प्लास्टिक आणि अन्य कचरा मोठया प्रमाणात आहे. तो जेसीबीद्वारा काढून नाल्याच्या काठावरच टाकला जात आहे.यामुळे मोठा पाऊस आल्यास काठावरील सर्व कचरा पुन्हा नाल्यात मिसळणार आहे. यामुळे नालेसफाईचा उद्देश काय असा प्रश्न निर्माण होत आहे.








