बिट्स पिलानी गोवा कॅम्पसच्या प्रतिष्ठेला डाग लागला. संशयास्पद मृत्यू आणि अमलीपदार्थ कळीचा मुद्दा ठरला. फर्मागुडीचा आयआयटी परिसरसुध्दा अमलीपदार्थांचा रेलचेलीसाठी अधेमध्ये चर्चेत असतोच. ‘बिट्स’मध्ये विद्यार्थ्यांच्या मृत्यूंची मालिकाच सुरू झाल्याने गवगवा झाला. ऋषी नायरच्या पोटात अमलीपदार्थांचा अंश सापडला नसता तर प्रकरण थोडक्यात थंडावलेही असते. हॉस्टेलच्या खोलीत दहा महिन्यांत पाच संशयास्पद मृत्यू, हा प्रकार केवळ ‘बिट्स’साठी नव्हे तर संपूर्ण गोव्याला लाजीरवाणा आहे. गोव्यात अमलीपदार्थांचा सुळसुळाट आहे, हे कुणी सांगण्याची गरज राहिलेली नाही. भविष्यात देशभरातील पालकांमध्ये गोव्यातील अशा शिक्षण संस्थांविषयी भीती निर्माण होऊ शकते…..
जगभरात नाव असलेल्या बिर्ला इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स अॅण्ड टेक्नोलॉजी (बिट्स) या संस्थेच्या आगमनाची चर्चा गोव्यात पंचवीस वर्षांपूर्वी सुरू झाली होती. प्रत्यक्षात 2000च्या सुमारास या संस्थेसाठी एकेकाळी राज्य सरकारकडून औद्योगिक कारणासाठी झुआरी कंपनीने घेतलेल्या जमिनीवर स्वतंत्र कॅम्पसच्या कामाला सुरुवात झाली. 20-22 वर्षांपूर्वी जेव्हा संस्थेचा शैक्षणिक कार्यारंभ झाला, त्यावेळी सांकवाळचा हा खडकाळ, ओसाड पठार फुलला होता. जमिनीचा नक्षाच बदलला होता. या शिक्षण संस्थेच्या परिसराने एक नवे आकर्षण गोव्यात उभे केले होते. आज मात्र या परिसराला डाग लागला आहे. विद्यार्थ्यांमधील मानसिक तणाव, अमलीपदार्थांचा शिरकाव आणि इतर नशापानाची लागण ‘बिट्स’च्या वाट्यालाही आलेली आहे. हजारो विद्यार्थ्यांपैकी अवघेच काही विद्यार्थी-विद्यार्थिनी वाममार्गाला लागतात, हे खरे आहे मात्र तेच शैक्षणिक संस्कृती नासवतात. शैक्षणिक परिसर नशामुक्त असावा, तणावमुक्त असावा किंवा कॅम्पसमध्ये शिरलेली कीड समूळ नष्ट व्हावी, यासाठी आता व्यवस्थापनाला कठोर पावले उचलावी लागतील. विद्यार्थ्यांचे मानसिक आरोग्य जपण्याची आणि त्यांना व्यसनांपासून दूर ठेवण्याची जबाबदारी आता पेलावी लागेल. स्थानिक पोलिस आणि इतर यंत्रणांचीही भूमिका महत्त्वाची ठरणार आहे. प्रश्न केवळ ‘बिट्स’च्या प्रतिष्ठेचा नाही, साऱ्या गोव्याच्या बदनामीचा आहे.
‘आयआयटी’साठी स्वतंत्र कॅम्पसचे गोव्यात स्वागतच व्हायला हवे, यात संशय नाही मात्र ज्या गावात आयआयटी येईल तिथे भलतीच चिंता निर्माण होणार नाही, याची खबरदारी सरकारलाच घ्यावी लागेल. बिट्स पिलानी कॅम्पस म्हणजे जवळपास आयआयटीच्या धर्तीचाच कॅम्पस्. देशभरातील विद्यार्थी गोव्याच्या ‘बिट्स’मध्ये प्रवेश घेतात. कुशाग्र बुद्धिमत्ता घेऊनच ते येतात. त्यांनी आणि त्यांच्या पालकांनी भविष्यातील अनेक स्वप्ने पाहिलेली असतात. त्यातील काहीजण वाट चुकतात. कुशाग्र जैन, अथर्व देसाई, ऋषी नायर, आकाश गुप्ता, ओम प्रियान सिंग, कृष्णा कासेरा असे काहीजण चुकलेच. अजूनही अनेक विद्यार्थ्यांचे पाय वाकडे पडले असावेत. त्यांना पुन्हा योग्य मार्गावर आणण्याची जबाबदारी शिक्षण संस्थेचे व्यवस्थापन आणि पालकांची आहे. मुलांच्या चुकीच्या वर्तनाची जबाबदारी कुणीतरी घ्यायलाच हवी. विद्यार्थ्यांवर आत्महत्या करण्याची वेळ का येते, त्यांचा संशयास्पद मृत्यू का होतो, त्यांच्या पोटात मादक द्रव्यांचे अंश कसे काय सापडतात, या प्रश्नांची उत्तरे देण्याची जबाबदारी व्यवस्थापनाची आहे. असेच घडत राहिले तर गोव्यातील ‘बिट्स’मध्येच नव्हे तर गोव्यातील शिक्षण संस्थांमध्ये वातावरणच असुरक्षित आहे, असाच संदेश देशभर जाईल.
मागच्या दहा महिन्यांत एका मागोमाग पाच कुशाग्र विद्यार्थ्यांनी आपले जीवन संपविले. विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांच्या दाव्यानुसार पाच नव्हे तर सहा मुलांनी जीवन संपविले आहे. आकाश गुप्ता याचा संशयास्पद मृत्यू लपविण्यात आल्याचा दावा त्यांनी पेलेला आहे. त्यामुळे आणखीही विद्यार्थी कसल्या ना कसल्या कारणाने मानसिक तणावात असतील. अमलीपदार्थांना वश झालेले असतील किंवा अन्य व्यसनांच्या जवळ गेलेले असण्याची शक्यता आहे. आणखी बळी न जाण्यासाठी आताच खबरदारी घेणे, ही व्यवस्थापन आणि पालकांचीही जबाबदारी आहे. ‘बिट्स’च्या पाच मुलांपैकी काहींनी गळफास घेऊन आत्महत्या केली तर काहींचा मृत्यू संशयास्पदरित्या झाला. विशेष म्हणजे, या मृत्यूंची आजही चौकशीच चालू आहे. केवळ ऋषी नायर या विद्यार्थ्याच्या मृत्युवरच अधिक प्रकाश पडलेला आहे. त्याच्या शरीरात मादक द्रव्यांचे अंश सापडल्यानेच, जी शक्यता पूर्वीपासूनच व्यक्त करण्यात येत होती, ती खरी ठरली. विद्यार्थी कॅम्पसमध्ये की कॅम्पसच्याबाहेर अमलीपदार्थांचे सेवन करतात, याचा विचार करण्यापेक्षा, विद्यार्थी त्याचे सेवन करतात, हाच गंभीर प्रश्न आहे. कॅम्पसमध्ये ठिकठिकाणी सहाशे कॅमेऱ्यांची नजर असली तरी हॉस्टेलच्या खोलीत कॅमेरे लावता येत नाहीत. त्यामुळे कॅमेरे हा प्रश्न सोडवू शकत नसल्याचे सिद्धच झाले. विद्यार्थ्यांमध्ये नशाहिन मानसिकता निर्माण करणे शिक्षण संस्थेचे व्यवस्थापन व पालकांची जबाबदारी आहे. ‘बिट्स’मध्ये आजघडीस साडेचार हजार विद्यार्थी आहेत व त्यांच्यासाठी 22 हॉस्टेल्स आहेत. प्रत्येक विद्यार्थ्यांची किंवा इतरांची वेळोवेळी झडती घेणेही कल्पनेच्या पलीकडचे आहे.
सध्या सांकवाळचा बिट्स पिलानी गोवा कॅम्पस पोलिसांचे लक्ष्य ठरलेले आहे. चौकशीसाठी वरिष्ठांना येरझाऱ्या घालाव्या लागत आहेत. काहींना तळ ठोकावा लागत आहे मात्र पोलिसांना हवे असलेले पुरावे आता हाती लागण्याची शक्यताच नाही. पोलिस कुठल्या निष्कर्षापर्यंत येतात, हे कळेलच. बिट्समध्ये विद्यार्थ्यांच्या आतापर्यंत झालेल्या मृत्युंच्या चौकशीसाठी सरकारने जिल्हाधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली चौकशी समिती स्थापन केलेली आहे. विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी तर निवृत्त न्यायाधीशांमार्फत न्यायालयीन चौकशी व्हावी, अशी मागणी केलेली आहे. राजकीय पक्षांनी थोड्या-फार प्रमाणात या प्रकरणात योग्य मुद्दे उपस्थित करून सरकारला आणि व्यवस्थापनाला लक्ष्य केले, हे योग्यच.
गोव्याला अमलीपदार्थ नवीन नाहीत. गोव्याच्या पोलिस यंत्रणेला काहीच माहीत नाही, असेही नाही. पर्यटन व्यवसायाच्या निमित्ताने अनेकांचा हा धंदा राजरोसपणे चालतो. महाविद्यालयीन युवकांपर्यंत तो पोहोचल्याने, बिट्स, आयआयटी, एनआयटी या नशेपासून मुक्त असू शकत नाही. पर्यटन राज्य असल्याने हा धंदा गोव्यात फोफावलेला. या धंद्यातून काहीजण नेतेही बनले. काही नेते माया जमवून साफ-सुथरे राहिले, हेही जनता जाणून आहे. मागच्या पाच वर्षांत जवळपास सत्तर कोटींचा अमलीपदार्थ पोलिसांनी जप्त केला आहे. मग जप्त न केलेला माल किती कोटींचा असेल? गोव्यातील युवा पिढी या नशेला बळी पडत असल्याची चिंता आहेच.
शिवाय नशिल्या पदार्थांच्या धंद्यात स्थानिक लोकांची संख्याही वाढत आहे, हे अधिक धोकादायक आहे. पर्यटन व्यवसायाच्या नावाखाली गोव्यात अनेक गैरधंदे चालतात. पर्यटनाच्या नावाखाली काहीही सहन करणे, गोमंतकीयांनी आता सोडून द्यायला हवे. गोव्यात अमलीपदार्थांचा सुळसुळाट आहे, हे कधीतरी खोटे ठरायला हवे.
अनिलकुमार शिंदे








