वृत्तसंस्था/ हैदराबाद
तेलंगणा फार्मा कारखान्यातील स्फोटातील मृतांचा आकडा 42 वर पोहोचला आहे. रविवारी रुग्णालयात एका व्यक्तीचा मृत्यू झाला, तर डीएनए चाचणीद्वारे एका मृतदेहाची ओळख पटवण्यात आली आहे. अजूनही 8 जण बेपत्ता असल्याचे आढळून आले असून अपघातानंतर 6 दिवसांनीही शोधमोहीम सुरू आहे. गेल्या दोन दिवसात घटनास्थळावरून काही हाडे आणि जळालेले शरीराचे अवयव सापडले. त्यांची डीएनए चाचणी सुरू आहे.
30 जून रोजी पसुमिल्लाराम औद्योगिक क्षेत्रातील सिगाची इंडस्ट्रीजमध्ये सकाळी 8.15 ते 9.30 च्या दरम्यान स्फोट होऊन मोठी दुर्घटना घडली होती. घटनेच्या वेळी कारखान्यात 150 लोक होते. त्यापैकी बऱ्याच जणांना वाचवण्यात आले होते. दुर्घटनेच्या दिवशी बचाव आणि वैद्यकीय पथकाने 31 मृतदेह बाहेर काढले होते.








