वृत्तसंस्था/ इंफाळ
मणिपूरमध्ये कुकी-नागा आणि मैतेई समुदायांमध्ये 3 मेपासून सुरू झालेल्या हिंसाचारातील मृतांची संख्या 71 वर पोहोचली आहे. मणिपूर सरकारचे सुरक्षा सल्लागार कुलदीप सिंग यांनी ही माहिती दिली. मणिपूरमधील हिंसाचारात 230 हून अधिक लोक जखमी झाले असून 1700 घरे जाळण्यात आल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. राज्यात 10 दिवसांपूर्वी झालेल्या हिंसाचारानंतर येथे इंटरनेट अजूनही बंद आहे.
जातीय हिंसाचारानंतर राज्यातील 10 आदिवासी आमदारांनी आदिवासींसाठी स्वतंत्र प्रशासनाची मागणी केली आहे. या आमदारांनी मुख्यमंत्री एन बिरेन सिंग यांच्या नेतृत्वाखालील मणिपूर सरकारवर राज्यातील हिंसाचाराचे समर्थन केल्याचा आरोप केला आहे. आदिवासी यापुढे मणिपूरमध्ये राहू शकत नाहीत आणि त्यांना भारतीय राज्यघटनेनुसार स्वतंत्र प्रशासन आवश्यक असल्याचे प्रतिपादन त्यांनी केले आहे. राज्याच्या काही भागात अजूनही हिंसाचार सुरू आहे. आसाम रायफल्स, बीएसएफ आणि सीआरपीएफने सुरक्षा यंत्रणा सतर्क करत विशेष मोहीम हाती घेतली आहे. परंतु हिंसाचारग्रस्त भाग पूर्णपणे तणावमुक्त करण्यात यंत्रणांना यश आलेले नाही.









