ऑनलाईन टीम / तरुण भारत :
शिंदे गटाचे वैजापूरचे आमदार प्रा. रमेश बोरनारे यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. बोरनारे यांच्या निवासस्थानी निनावी धमकीचे पत्र आले आहे. त्यांनी यासंदर्भात पोलिसात तक्रार दिली असून, पोलिसांनी तपास सुरू केला आहे.
आ. बोरनारे हे वैजापूर विधानसभा मतदारसंघातील शिवसेनेचे आमदार आहेत. एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यानंतर त्यांनीही बंड करत आधी सूरत आणि नंतर गुवाहटी गाठलं होतं. वैजापूर मतदार संघावर त्यांची पकड आहे. सध्या वैजापूर कृषी उत्पन्न बाजार समितीची रणधुमाळी सुरू आहे. मतदार व शेतकऱ्यांचा गाठीभेटी घेण्यासाठी संपर्क मोहिम राबवत असतानाच त्यांना हे धमकीचे पत्र मिळाले आहे. पोलिसांनी त्याची गांभीर्याने दखल घेतली आहे.
बोरनारे यांच्या सुरक्षा कर्मचाऱ्यांना अधिक सतर्क राहण्याच्या सूचना पोलिसांनी दिल्या आहेत. तसेच या धमकी पत्राची चौकशी देखील सुरू करण्यात आली आहे. हे पत्र नगर जिल्ह्यातील कर्जत येथून पाठवण्यात आले आहे. या पत्रावर कर्जत पोस्ट ऑफिसचा शिक्का असल्याचे समोर आले आहे.








