दिल्ली पोलिसांना फोनवरून मिळाली धमकी
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
दिल्ली पोलिसांना बुधवारी दोन पीसीआर कॉल प्राप्त झाले, ज्यात पंतप्रधान, केंद्रीय गृहमंत्री आणि बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती. यासंबंधी तपास सुरू असून कॉल करणाऱ्या व्यक्तीचा शोध लावण्यासाठी पथक तैनात करण्यात आले होते. तर फोन कॉल करणारा आरोपी मद्यपी असून लवकरच त्याला पकडण्यात येईल असे पोलिसांकडून सांगण्यात आले. संबंधित आरोपीच्या घरी पोहोचल्यावर तो तेथे नसल्याचे अन् पूर्णपणे मद्याच्या आहारी गेल्याचे कळले होते. धमकीचे दोन्ही कॉल एकाच नंबरवरून करण्यात आले होते. याचमुळे पोलिसांनी त्वरित पावले उचलत कॉल करणाऱ्या इसमाची ओळख पटविली होती. संबंधित आरोपीचे नाव सुधीर शर्मा असून त्याला अटक करण्यासाठी पावले उचलण्यात आली आहेत.









