ऑनलाईन टीम / तरुण भारत :
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. गडकरी यांच्या नागपूर येथील कार्यालयात फोन करुन अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमच्या नावाच्या ही धमकी देण्यात आली असून, दोन कोटींची खंडणी मागण्यात आली आहे.
गडकरी यांचे नागपूर येथील खामला परिसरात कार्यालय आहे. या कार्यालयात सकाळी 11.30 वाजता पहिला फोन आला. त्यानंतर 12.40 मिनिटांनी आणखी एक फोन आला. या फोनमध्ये दाऊद इब्राहिमच्या नावाचा उल्लेख करत दोन कोटी रुपये द्या अन्यथा ठार मारू, अशी धमकी देण्यात आली. या फोननंतर कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी तातडीने पोलिसांना याबाबतची माहिती दिली.
दरम्यान, सायबर पोलिसांनी धमकीचे फोन कुठून आले? याचा तपास सुरू केला आहे. गडकरींचे कार्यालय आणि निवासस्थानाची सुरक्षाही वाढविण्यात आली आहे.








