वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री संजय सेठ यांनी शनिवारी आपल्याला खंडणीची धमकी मिळाल्याचा दावा केला. त्यांनी यासंदर्भात दिल्ली पोलीस आणि झारखंडचे पोलीस महासंचालक (डीजीपी) यांच्याकडे रितसर तक्रार नोंदवली आहे. शुक्रवारी आपल्या मोबाईलवर अज्ञात क्रमांकावरून एक संदेश आला असून त्यामध्ये 50 लाख रुपयांची खंडणी मागितल्याचे त्यांनी म्हटले आहे. तसेच संदेश पाठवणाऱ्या व्यक्तीने आपल्याला जीवे मारण्याची धमकीही दिल्याचे त्यांनी स्पष्ट केले. केंद्रीय मंत्री संजय सेठ यांनी केलेल्या तक्रारीनुसार पोलिसांनी संबंधिताचा शोध घेण्यासाठी तपास अधिकाऱ्यांना रवाना केले आहे. केंद्रीय संरक्षण राज्यमंत्र्यांना धमकीचा संदेश देण्यात आला असून 50 लाख रुपयांच्या खंडणीची मागणी करण्यात आल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले.









