अमली पदार्थांच्या तस्करीचा आरोप
► वृत्तसंस्था/ जकार्ता
इंडोनेशियाच्या उच्च न्यायालयाने राजू मुथुकुमारन, सेल्वादुराई दिनकरन आणि गोविंदसामी विमलकंदन या तीन भारतीय नागरिकांना अमली पदार्थांच्या तस्करीच्या आरोपाखाली मृत्युदंडाची शिक्षा कायम ठेवली आहे. भारताने या प्रकरणावर आक्षेप घेतला आहे. तंजुंग बलाई करिमुन जिल्हा न्यायालयाने यापूर्वी त्यांना दोषी ठरवून मृत्युदंडाची शिक्षा सुनावली होती. मात्र, आता उच्च न्यायालयानेही त्यांची शिक्षा कायम ठेवली आहे. शिक्षा ठोठावण्यात आलेल्या तिघांना गेल्यावर्षी जुलैमध्ये इंडोनेशियाच्या रियाउ बेटांमधील करिमुन बेटाजवळ सिंगापूरच्या ध्वजांकित जहाजातून अटक करण्यात आली होती.
इंडोनेशियातील भारतीय राजदूत संदीप चक्रवर्ती यांनी या प्रकरणाची पुन्हा चौकशी करण्याची औपचारिक मागणी केली आहे. आम्हाला इंडोनेशियन न्यायव्यवस्थेवर विश्वास असल्यामुळे आम्ही पुन्हा चौकशी करण्याची मागणी केली आहे. जहाजाच्या कॅप्टन आणि क्रूसह सर्व साक्षीदारांचीही सखोल चौकशी झाली पाहिजे, असे चक्रवर्ती यांनी म्हटले आहे. आम्हाला तपासात अनेक विसंगती आढळल्या आहेत. मोबाईल फोन रेकॉर्डसह सर्व पुरावे तपासले गेले नाहीत. मृत्युदंड हा एक कठोर निर्णय असून ही शिक्षा दुर्मिळातील दुर्मिळ प्रकरणांमध्येच दिली जाऊ शकते. अशा परिस्थितीत, या प्रकरणाची पुन्हा चौकशी केली पाहिजे, असे ते पुढे म्हणाले.









