वृत्तसंस्था / कोलकाता
कोलकाता येथील एका न्यायालयाने सात महिन्यांच्या बालिकेवर बलात्कार करणाऱ्याला मृत्यूदंडाची शिक्षा ठोठावली आहे. पोक्सो कायद्याच्या अंतर्गत ही शिक्षा देण्यात आली आहे. या प्रकरणातील आरोपीला अडीच महिन्यांपूर्वी अटक करण्यात आली होती. केवळ 75 दिवसांमध्ये या प्रकरणाची सुनावणी पूर्ण करुन आरोपीला मृत्यूदंडाची शिक्षा देण्यात आली आहे. आरोपीने या सात महिन्यांच्या बालिकेवर बलात्कार करुन तिची हत्याही करण्याचा प्रयत्न केल्याचे सिद्ध झाले आहे.
या प्रकरणातील आरोपीचे नाव राजीब घोष असे आहे. त्याने हा निर्घृण गुन्हा गेल्या वर्षी 30 नोव्हेंबरला केला होता. त्याला 5 डिसेंबरला अटक करण्यात आली होती. या प्रकरणातील पिडीत बालिकेवर अद्यापही आर. जी. कर वैद्यकीय रुग्णालयात उपचार केले जात आहेत, अशी माहिती देण्यात आली आहे.
केवळ 40 दिवसांमध्ये…
या प्रकरणाची सुनावणी पोक्सो न्यायालयात कोलकाता येथे केवळ 40 दिवसांमध्ये पूर्ण करण्यात आली आहे. 7 जानेवारीला आरोतीविरुद्धच्या अभियोगाला न्यायालयात प्रारंभ करण्यात आला होता. या प्रकरणाची गंभीरता पाहता न्यायालयाने वेगवान सुनावणी करण्याचा निर्णय घेतला होता. हे प्रकरण दुर्मिळातील दुर्मिळ आहे. त्यामुळे आरोपीला मृत्यूदंडाचीच शिक्षा योग्य आहे. अशा नराधमांना जिवंत राहण्याचा अधिकार नाही, असे न्यायालयाने स्पष्ट केले आहे.









