जत, प्रतिनिधी
जत शहरापासून जवळच असलेल्या श्री यलम्मा देवीच्या विहिरीकडे जाणाऱ्या रस्त्यावर सकाळी फिरावयास गेलेल्या लोकांना एका तरुणाचा मृतदेह दिसून आला. त्या तरुणाचा मृतदेह संशयास्पदरित्या पडला होता. तसेच त्याच्या तोंडाला व गळ्याला मार लागल्याने रक्तस्त्राव सुरू होता. त्या तरुणाच्या नाकाचा काही भाग नाहीसा झाल्याने प्रथमदर्शनी बघ्यांना त्या तरुणाचा खून झाला असल्याची खात्री पटली. परंतु शव विच्छेदन झाल्यानंतर हा खून नसून मद्यप्राशन झाल्याने त्याचा मृत्यू झाल्याचे निष्पन्न झाले आहे.
दरम्यान, जत तालुक्यातील कोसारीतील मार्च महिन्यात झालेला दुहेरी खून, त्यानंतर माजी नगरसेवक विजय ताड यांचा खून, रामपूरमध्ये दोघांचा संशयास्पद मृत्यू त्यापाठोपाठ रविवारी जत शहरात तरुणाचा खून झाल्याची चर्चा वाऱ्यासारखी जतमध्ये पसरताच संपूर्ण तालुक्यात चर्चेला उधाण व भितीचे वातावरण पसरले होते. अखेर त्या तरुणाचा खून नव्हे तर अतिमद्यप्राशन केल्यानंतर रस्त्याकडेला पडून मृत्यू झाला. मृत्यूनंतर वन्यजिवाने लचके तोडले असल्याचे पोलिसांनी सांगितले. ही घटना खुनाची घटना नसल्याचे समजताच पोलीस व नागरिकांनी सुटकेचा निश्वास सोडला.
अधिक माहिती अशी, जत- अथणी रोडवर प्रसिद्ध श्री यलम्मा मंदिर आहे. मंदिराजवळ असलेल्या मदने वस्ती येथील सचिन उर्फ शशिकांत बिरा मदने हा ट्रॅक्टरवर ड्रायव्हर म्हणून काम करतो. रविवारी सकाळी त्याचा मृतदेह सकाळी फिरण्यास गेलेल्या लोकांना संशयास्पदरित्या दिसून आला. यानंतर खून झाल्याची घटना जत शहरासह तालुक्यात वाऱ्यासारखी पसरली. घटनेची माहिती मिळताच जतच्या डीवायएसपी अश्विनी शेंडगे, पोलीस निरीक्षक राजेश रामाघरे यांनी घटनास्थळी धाव घेतली. श्वान पथकलाही पाचारण करण्यात आले. घटनास्थळापासून मयत मदनेच्या घरापर्यत श्वान घुटमळले. दरम्यानच्या काळात मयत मदने याचा मृतदेह शवविच्छेदनासाठी जत ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आला होता.
शवविच्छेदनानंतर कारण झाले स्पष्ट
मयत संदीप उर्फ शशिकांत बिरा मदने याच्या मृत्यूने तालुक्यात खळबळ उडाली व चर्चेला उधाण आले. मयत मदने याचा मृतदेह शवविच्छेदनासाठी जत ग्रामीण रुग्णालयात दाखल केल्यानंतर सर्वांच्या नजरा त्याकडे लागल्या होत्या. वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तात्काळ शवविच्छेदन करून मयत मदने याचा मृत्यू हा अतिमद्यसेवनामुळे झाला आहे. तसेच त्याच्यया अंगावरील जखमा या जनावरांने लचके तोडल्याने झाल्याचे सांगितले. शवविच्छेदनानंतर कारण स्पष्ट झाल्यानंतर पोलीस यंत्रणेने सुटकेचा निश्वास सोडला. तसेच मदने यांच्या नातेवाईकांनी देखील कुठल्याही घातपाताची तक्रार दिली नाही. अधिक तपास सपोनी जगताप करीत आहेत.