वयाच्या 99 व्या वषी घेतला अखेरचा श्वास ः राष्ट्रपती-पंतप्रधानांनी व्यक्त केला शोक
भोपाळ / वृत्तसंस्था
हिंदूंचे सर्वात मोठे धर्मगुरू तसेच द्वारका आणि शारदा पीठाचे शंकराचार्य स्वामी स्वरुपानंद यांचे रविवार, 11 सप्टेंबर रोजी देहावसान झाले. स्वामी स्वरुपानंद यांनी वयाच्या 99 व्या वषी रविवारी दुपारच्या सुमारास अखेरचा श्वास घेतला. मध्यप्रदेशातील नरसिंगपूर जिह्यातील गोटेगावजवळील झोतेश्वर आश्रमात त्यांचे देहावसान झाले. दरम्यान, स्वरुपानंद ब्रह्मलीन असल्याची बातमी वाऱयासारखी पसरताच आश्रमात त्यांच्या भक्तांची गर्दी होऊ लागली होती. स्वामी स्वरुपानंद यांच्या देहावसानासंबंधी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह मान्यवरांनी शोकभावना व्यक्त केल्या आहेत.
स्वरुपानंद सरस्वती हे हिंदूंचे सर्वात मोठे धार्मिक नेते मानले जात होते. शंकराचार्य स्वामी स्वरुपानंद यांच्याकडे बद्री आश्रम आणि द्वारकापीठाची जबाबदारी होती. मृत्यूसमयी ते आपल्या आश्रमातच होते. गेल्या अनेक दिवसांपासून ते आजारी होते. त्यांच्यावर नरसिंगपूर जिह्यातील झोतेश्वर आश्रमात उपचार सुरू होते. त्यांच्या शेवटच्या काळात त्यांचे काही निवडक शिष्य आश्रमात त्यांच्यासोबत राहत होते. अलीकडेच त्यांचा वाढदिवस साजरा झाला होता. या सोहळय़ावेळी राज्याचे माजी मुख्यमंत्री कमलनाथ यांनी आश्रमात जाऊन त्यांचे अभीष्टचिंतन करत आशीर्वाद घेतले होते.
स्वामी स्वरूपानंद सरस्वती यांचा जन्म 2 सप्टेंबर 1924 रोजी मध्यप्रदेश राज्यातील सिवनी जिह्यातील जबलपूरजवळील दिघोरी गावात झाला होता. वडील श्री धनपती उपाध्याय आणि आई श्रीमती गिरिजा देवी यांच्या ब्राह्मण कुटुंबात ते जन्माला आले. आई-वडिलांनी त्यांचे नाव पोथीराम उपाध्याय असे ठेवले होते. वयाच्या नवव्या वषी त्यांनी घर सोडले आणि धार्मिक तीर्थयात्रा सुरू केली. यादरम्यान काशीला दाखल होत त्यांनी श्री स्वामी करपात्री महाराज वेद-वेदांग, शास्त्र शिकले.
स्वातंत्र्यलढय़ात सहभाग
भारताला इंग्रजांपासून मुक्त करण्याचा लढा सुरू असताना स्वरुपानंद सरस्वती यांनी त्यातही स्वतःला झोकून दिले होते. 1942 मध्ये ब्रिटिशांनी भारत छोडोचा नारा दिला तेव्हा त्यांनी स्वातंत्र्यलढय़ातही उडी घेतली. वयाच्या 19 व्या वषी ते ‘क्रांतिकारक साधू’ म्हणून प्रसिद्ध झाले. यावेळी त्यांनी नऊ महिने वाराणसी तुरुंगात आणि सहा महिने मध्यप्रदेशच्या तुरुंगातही काढले.
1981 मध्ये ‘शंकराचार्य’ उपाधी
जगद्गुरु शंकराचार्य हे करपात्री महाराजांच्या राजकीय पक्ष रामराज्य परिषदेचे अध्यक्षही होते. 1950 मध्ये त्यांना दांडी संन्यासी बनवण्यात आले. 1950 मध्ये शारदा पीठाचे शंकराचार्य स्वामी ब्रह्मानंद सरस्वती यांच्याकडून दीक्षा घेतली आणि स्वामी स्वरुपानंद सरस्वती म्हणून ओळखले जाऊ लागले. तसेच 1981 मध्ये त्यांना ‘शंकराचार्य’ ही पदवी मिळाली. भक्तीमार्गाबरोबरच राजकारणातही ते सक्रिय होते. विविध मुद्दय़ांवर वेळोवेळी ते सरकारविरोधात आवाज उठवत असत. तसेच ते आपल्या भक्तांना वेळोवेळी योग्य सल्ला आणि मार्गदर्शनही करत होते. त्यांचा मोठा भक्तगण त्यांच्यावर श्रद्धा ठेऊन होता.









