बोरगाव येथील घटना : कुटुंबीयांकडून आत्मदहनाचा इशारा : दोषीवर कारवाई करण्याची मागणी
वार्ताहर /बोरगाव
येथील आरएमपी डॉ. महावीर बंकापुरे यांच्या हलगर्जीपणामुळे येथील एका गर्भवती महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना 6 रोजी उघडकीस आली. शेजल अनिकेत माळी (वय 22) असे मृत महिलेचे नाव आहे. सदर महिलेच्या मृत्यूला डॉ. बंकापुरे हेच जबाबदार असल्याचा आरोप नगरसेवक प्रदीप माळी यांच्यासह नातेवाईकांनी करून दवाखान्यासमोर आक्रोश केला. याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की, डॉ. बंकापुरे हे आपल्या खासगी दवाखान्यामध्ये गेल्या अनेक वर्षांपासून प्रसूती करण्याचे काम करत असल्याने शेजल माळी या प्रसूती उपचार घेण्यासाठी 19 ऑक्टोबर रोजी बंकापूरे यांच्या इस्पितळात दाखल झाल्या होत्या. यावेळी डॉ. बंकापूरे यांनी शेजल यांना दाखल करून घेऊन प्रसूती प्रक्रिया सुरू केली. दरम्यान, गर्भवती महिलेची प्रकृती चिंताजनक बनल्याने सदर डॉक्टरांनी त्या गर्भवती महिलेची प्रसूती अर्ध्यावरच सोडून सदर महिलेस शेजारील महाराष्ट्रातील खासगी दवाखान्यात उपचारासाठी स्वत:हून हलविले. परिणामी कोणतीही डिग्री नसताना, अपुऱ्या साधन सामग्रीने गर्भवती महिलेवर केलेल्या उपचारातून झालेल्या इन्फेक्शनमुळे त्या महिलेचा मृत्यू झाला, असा आरोप संबंधित महिलेचा पती अनिकेत यांनी केला. ही घटना गुरुवारी रात्री उशीरा घडली. प्रसूती दरम्यानच गर्भवतेचा मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी सकाळी उघडकीस आली.
त्यामुळे संतप्त कुटुंबीयांनी प्राथमिक आरोग्य केंद्राचे डॉक्टर, अंगणवाडी व आशा कार्यकर्त्यांसमवेत दवाखान्याला घेराव घालून या गर्भवती महिलेच्या मृत्यूला जबाबदार कोण? असा सवाल करत बेकायदेशीररित्या होणाऱ्या या प्रसूती प्रकरणाला कायमचा आळा बसावा व दोषींवर कठोर कारवाई व्हावी, अन्यथा आपण दवाखान्यासमोर आत्मदहन करण्याचा इशारा महिलेचे नातेवाईक व विद्यमान नगरसेवक प्रदीप माळी यांनी दिला. यावेळी डॉ. महावीर बंकापुरे म्हणाले, आपण 30 वर्षांच्या अनुभवावरून जवळपास 5 हजार गर्भवती महिलांची प्रसूती केली आहे. याही महिलेची आपण प्रसूती करत असताना महिलेची प्रकृती चिंताजनक बनल्याने सदर महिलेस आपण इतरत्र दवाखान्यामध्ये उपचारासाठी दाखल केल्याची कबुली दिली. एखाद्याचे नुकसान व्हावे, अशी भावना आपली नसून आपण एक सामाजिक हिताचे कार्य करीत असल्याचे सांगितले. यावेळी नगरसेविका शोभा हावले, वर्षा मनगुत्ते, भारती वसवाडे यांच्यासह अंगणवाडी, आशा कार्यकर्त्या उपस्थित होत्या.
प्रकरणाची सखोल चौकशी करू…
कोणतीही पदवी नसताना खासगी दवाखान्यात प्रसूती करणे बेकायदा आहे. अशी परिस्थिती असताना बंकापुरे हे कोणत्या आधारावर प्रसूती करीत आहेत. या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषीवर लवकरच आपण कारवाई करणार आहे, अशी माहिती चिकोडी वैद्याधिकारी डॉ. भागाई यांनी दिली.









