दोडामार्ग – वार्ताहर
झरेबांबर – विमानतळ येथे शाॅक लावून मासे पकडणे एका परप्रांतीय युवकाच्या जीवावर बेतले. पाय घसरून पाण्यात पडल्याने व विजेचा धक्का लागल्याने त्या युवकाचा जागीच मृत्यू झाला. आयझॅक इग्विस बिलुंग (१७ वर्षे), रा. रायधीही, ता. सुदरगड, ओरीसा असे मयत युवकाचे नाव असून शनिवारी रात्री ही घटना घडली असावी असा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.
येथील पोलीस ठाण्यातून मिळालेली माहिती अशी की, झरेबांबर-विमानतळ येथे एका व्यक्तीकडे मयत आयझॅक बिलुंग हा कामानिमित्त राहत होता. रविवारी सकाळी त्याचा सुपरवायझर त्याला कामासाठी न्यायला आला असता आयझॅक हा मिळाला नाही. त्यामुळे त्याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. यावेळी घरातून विद्युत भारित तारा बाहेर गेले असल्याचे सुपरवायझरच्या निदर्शनास आले. त्याने सर्वप्रथम बटन बंद केले व विद्युत तारांच्या दिशेने गेला. त्या तारा लगतच्या ओहोळावर गेलैल्या त्याच्या निदर्शनास आले. तसेच तेथे त्याला आयझॅकचा मृतदेह आढळून आला. या घटनेची खबर पोलिसांना मिळताच पोलीस निरीक्षक अरुण पवार, सहाय्यक पोलीस निरीक्षक जयेश ठाकूर व त्यांची टीम घटनास्थळी दाखल झाली. स्थानिकांच्या मदतीने मृतदेह बाहेर काढून येथील ग्रामीण रुग्णालयात शव विच्छेदनासाठी पाठविण्यात आला.









