अमेरिकेत कार दुर्घटनेत मारला गेल्याचा दावा
वृत्तसंस्था/ न्यूयॉर्क
दहशतवादी संघटना शीख फॉर जस्टिसचा कुख्यात खलिस्तानी दहशतवादी गुरपतवंत सिंह पन्नूचा अमेरिकेत रस्ते दुर्घटनेत मृत्यू झाल्याचे वृत्त समोर आले असले तरीही याची अद्याप पुष्टी होऊ शकलेली नाही. अमेरिकेच्या हायवे 101 वर पन्नूच्या कारची दुर्घटना झाल्याचे बोलले जात आहे. पन्नूच्या मृत्यूचे वृत्त केवळ अफवा देखील असण्याची शक्यता आहे. भारतीय गुप्तचर यंत्रणांकडून यासंबंधी पुष्टी मिळाल्यावरच पन्नूसंबंधीच्या वृत्ताची सत्यता समजणार आहे.
दहशतवादी पन्नू हा मागील काही काळापासून लपून बसला होता. स्वत:चे लोकेशन भारतीय गुप्तचर यंत्रणांना कळू नये म्हणून त्याने स्वत:चा मोबाइलही बंद करून ठेवला होता. पाकिस्तानात परमजीत सिंह पंजवड आणि कॅनडात हरदीप सिंह निज्जरची हत्या तर ब्रिटनमध्ये अवतार सिंह खांडाच्या मृत्यूनंतर पन्नूला स्वत:ची हत्या होण्याची भीती सतावू लागली होती.
पन्नू हा मूळचा अमृतसरच्या खानकोट गावचा रहिवासी होता. पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणा आयएसआयच्या निर्देशावर तो खलिस्तानी कारवायांना बळ देत होता. अमेरिकेसोबत इंग्लंड आणि कॅनडामध्ये स्वत:च्या संघटनेद्वारे तो भारताविरोधात दुष्प्रचार करत राहिला. पंजाबमध्ये अशांतता निर्माण करण्याचा त्याचा प्रयत्न होता. पन्नूने अलिकडेच खलिस्तान समर्थकांच्या हत्येनंतर यासाठी कॅनडा आणि अमेरिकेतील भारतीय दूतावासाच्या अधिकाऱ्यांना जबाबदार ठरविणारा व्हिडिओ जारी केला होता.
पन्नू हा ब्रिटनमधील खालसा इंटरनॅशनलचा परमजीत सिंह पम्मा, कॅनडातील केटीएफ प्रमुख हरदीप सिंह निज्जर, इंटरनॅशनल शीख यूथ फेडरेशनच्या मलकीत सिंह फौजीच्या संपर्कात होता. पंजाबमधील गँगस्टर आणि तरुणांना खलिस्तानी कारवायांमध्ये सामील होण्यासाठी चिथावणी देत होता. केंद्रीय गृह मंत्रालयाने पन्नूला दहशतवादी घोषित केले आहे.









