परिसरात आणखी एका बैला मध्ये आढळली लक्षणे, ग्रामपंचायतीसह पशुसंवर्धन विभाग अलर्ट
वार्ताहर/कळंबा
कळंबा परिसरात लम्पीसदृश आजाराने गाय व बैलाचा मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज पशु वैद्यकीय अधिकाऱ्यांनी वर्तवला आहे. या जनावरांचे रक्ताचे नमुने चाचणीसाठी पाठविण्यात आले आहेत. याचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर जनावरांचा नेमका मृत्यू कशामुळे झाला हे स्पष्ट होणार आहे. शनिवारी एका बैलामध्ये लम्पीसदृश्य आजाराची लक्षणे आढळल्याने कळंबा ग्रामपंचायतीसह पशु संवर्धन विभाग अलर्ट झाला आहे. या पार्श्वभूमीवर योग्य ती उपाययोजना राबविणार असल्याची सरपंच सागर भोगम यांनी सांगितले आहे. पशु वधकीय सहाय्यक अधिकारी प्रदीप कांबळे यांनी लम्पि सदृश्य गाईचा व बैलाचा मृत्यू झालेल्या जनावरांचे रक्ताचे नमुने पुण्याला अंतिम चाचणी करीत पाठवले असल्याचे सांगण्यात आले तर शनिवारी शिवाजी गायकवाड यांचा बैल आजारी असल्याने त्यांच्या बैलाचे रक्ताचे नमुने शनिवारी घेण्यात आले आहेत.
राज्यात लम्पी त्वचारोगाची लागण असंख्य जनावरांना झाली असतानाच, त्याचा करवीर (ता.) कळंबा येथे शिरकाव झाला आहे. कळंबा गावातील पशुपालक संभाजी तिवले यांची गाय व सुरेश निकम यांचा बैलचा मृत्यू झाला. जनावरांना लम्पी त्वचारोगाची सदृश्य लक्षणे असल्याचे समोर आले आहे. या प्रकारामुळे शेतकऱ्यात भीतीचे वातावरण पसरले आहे.
कळंबा येथील पशुपालक संभाजी तिवले व सुरेश निकम यांचा शेती व्यवसाय आहे त्यांच्याकडे अनेक जनावरे आहेत. त्यातील मृत झालेल्या गाईच्या अंगावर लम्पी सदृश्य लक्षणे दिसून आली असल्याने त्यांनी तत्काळ पशुवैद्यकिय सहाय्यक अधिकारी डॉ. प्रदीप कांबळे यांच्याशी संपर्क साधला. यावेळी संशयित गाईच्या रक्ताचे नमुने व बैलाच्या रक्ताचे नमुने तपासणीसाठी घेण्यात आले असून ते पुण्याला पाठवण्यात आल्याची माहिती कांबळे यांनी दिली आहे. पुण्याहून अहवाल आल्यानंतरच लम्पी रोग आहे की इतर कोणता आजार हे स्पष्ट होणार आहे.









