मुख्य संशयित सापडत नसल्याने म्हापसा पोलिसांवर संशय
म्हापसा : गणेशपुरी म्हापसा येथे पूर्ववैमनस्यातून झालेल्या हल्ल्यात जबर जखमी झालेल्या अहमद देवडी याचे उपचार घेत असताना काल मंगळवारी सायंकाळी गोमेकॉत निधन झाले. म्हापसा पोलिसांनी या हल्ल्याप्रकरणी आतापर्यंत 6 संशयितांना अटक केली आहे, मात्र मुख्य संशयित रामकृष्ण भालेकर उर्फ आर.के. याला पकडण्यात आता 20 दिवस उलटले तरी यश आलेले नाही. जोपर्यंत मुख्य संशयित आरोपीला पोलीस अटक करीत नाहीत, तोपर्यंत आम्ही अहमदचा मृतदेह ताब्यात घेणार नाही,असा पवित्रा देवडी कुटुंबियांनी घेतल्याने आता या प्रकरणाला वेगळे वळण लागले आहे.
याप्रकरणी म्हापसा पोलिसही संशयाच्या घेऱ्यात सापडले आहेत. अहमद देवडी यांच्यावर खुनी हल्ला करणारा मुख्य संशयित आरोपी आर.के. उर्फ रामकृष्ण भालेकर व त्याच्या बंधुला अद्याप अटक करण्यात आलेली नाही.एरव्ही पोलीस गुन्हा घडल्यास अवघ्या दोन दिवसात देशाच्या कानाकोपऱ्यातून संशयितांना पकडून आणतात, मात्र या प्रकरणात 20 दिवस उलटूनही मुख्य संशयित पोलिसांच्या जाळ्यात अडकलेला नाही. यामुळे म्हापसा पोलीस व एलआयबी टीम संशयितांच्या घेऱ्यात सापडली आहे.
आपल्या अहमदला न्याय द्या- आई अविना देवडी
आपला मुलगा गेला, मात्र आपल्या मुलाचे खुनी गेले 20 दिवस बाहेर मोकाट फिरतात. आपल्यास न्याय मिळाला नाही. निदान मरणानंतर तरी आपल्या मुलाला न्याय मिळेल काय, अशी खंत मयताची आई अविना देवडी यांनी व्यक्त केली. मुख्य आरोपींना अद्याप का अटक केली नाही. सरकारने आम्हाला न्याय द्यावा. जोपर्यंत मुख्य संशयित आरोपींना अटक होत नाही, तोपर्यंत अहमदचा मृतदेह आम्ही स्वीकारणार नाही, असे अहमदच्या कुटुंबियांनी सांगितले.