लष्कर-ए-तोयबाच्या अब्दुल भुट्टावीचा मृत्यू : युएनने घोषित केले होते दहशतवादी
वृत्तसंस्था/ लाहोर
2008 मध्ये मुंबईत झालेल्या दहशतवादी हल्ल्यांच्या प्लॅनिंगमध्ये सामील अब्दुल सलाम भुट्टावीचा पाकिस्तानच्या तुरुंगात हृदयविकाराच्या धक्क्यामुळे मृत्यू झाला आहे. पाकिस्तानच्या पंजाब प्रांतातील शेखपुरा तुरुंगात भुट्टावी कथित स्वरुपात शिक्षा भोगत होता. 2020 मध्ये लष्कर-ए-तोयबाचा म्होरक्या हाफिज सईदचा नातेवाईक अब्दुल रहमान मक्कीसोबत भुट्टावीला 16 वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली होती. भारताच्या गुप्तचर यंत्रणांनी भुट्टावीच्या मृत्यूची पुष्टी दिली आहे.
दहशतवादी हल्ल्यांसाठी निधी जमविणे, दहशतवादी संघटनांमध्ये भरती करण्याचा आरोप करत अमेरिकेने भुट्टावीवर निर्बंध लादले होते. भुट्टावीने स्वत:च्या भाषणांद्वारे आणि फतवे जारी करून दहशतवाद्यांना मुंबईवर हल्ले करण्यासाठी तयार केले होते. 2011 मध्ये भुट्टावीने लष्कर-ए-तोयबाचा सदस्य असल्याची कबुली दिली होती.
2012 मध्ये संयुक्त राष्ट्रसंघाच्या सुरक्षा परिषदेने भुट्टावीला दहशतवादी घोषित केले होते. 2002-08 दरम्यान लष्कर-ए-तोयबाचा प्रमुख हाफिज सईदला पाकिस्तानात ताब्यात घेण्यात आले होते. तेव्हा भुट्टावीच या दहशतवादी संघटनेचा प्रमुख झाला होता. लष्कर-ए-तोयबाचा भुट्टावी प्रमुख असतानाच 2008 मध्ये मुंबईत दहशतवादी हल्ला झाला होता. 10 दहशतवाद्यांनी मिळून हे हल्ले केले होते. या हल्ल्यांमध्ये 166 जणांचा मृत्यू झाला होता. मृतांमध्ये अमेरिका आणि ब्रिटनचे नागरिक सामील होते.