खेड :
तालुक्यातील सवणस-रांगलेवाडी येथील रहिवासी व सध्या घाटकोपर-मुंबई येथे वास्तव्यास असलेल्या अश्विनी रत्नू रांगले या 21 वर्षीय तरुणीचा चायनीज खाल्ल्याने झालेल्या विषबाधेतून मृत्यू झाला. तिच्यावर बुधवारी सायंकाळच्या सुमारास सवणस येथील नजीकच्या स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. या घटनेने रांगले कुटुंबियांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.
इयत्ता 12वीपर्यंतचे शिक्षण घेतलेली अश्विनी काही दिवसांपूर्वीच कामानिमित्त घाटकोपर-मुंबई येथे आली होती. ती घाटकोपर येथे कामालाही जात होती. 13 जुलै रोजी तिने चायनीज खाद्यपदार्थ खाल्ले होते. सलग दोन दिवस तिला उलट्यांचा त्रास जाणवत होता. शिवाय अशक्तपणा आल्याने उपचारासाठी राजवाडी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. या ठिकाणी उपचार सुरू असतानाच मंगळवारी रात्रीच्या सुमारास तिचा मृत्यू झाला. तिच्या पश्चात आई-वडील, एक भाऊ असा परिवार आहे.








