वंटमुरी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या डॉक्टरांवर दुर्लक्षपणाचा आरोप
प्रतिनिधी/ बेळगाव
प्रसूतीसाठी वंटमुरी प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल झालेल्या एका महिलेचा मृत्यू झाला आहे. शुक्रवारी ही घटना घडली असून डॉक्टरांच्या दुर्लक्षपणामुळे तिचा मृत्यू झाल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला आहे. माळमारुती पोलीस स्थानकात या घटनेची नोंद झाली आहे. निकिता मल्लिकार्जुन मादर (वय 23) राहणार दत्त मंदिरजवळ, वंटमुरी कॉलनी असे त्या दुर्दैवी महिलेचे नाव आहे. तिच्या पश्चात पती, एक मुलगी असा परिवार आहे. शुक्रवार दि. 29 ऑगस्ट रोजी सकाळी 10 वाजण्याच्या सुमारास कळा आल्यामुळे तिला कुटुंबीयांनी तातडीने वंटमुरी प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले.
शुक्रवारी रात्री 8.30 वाजण्याच्या सुमारास तिचे सिझेरियन झाले. तिने मुलीला जन्म दिल्याचे डॉक्टरांनी सांगितले. यावेळी निकिताच्या आरोग्याविषयी त्यांनी कसलीच माहिती दिली नाही. थोड्यावेळाने सिझेरियननंतर निकिताचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. त्यावेळी कुटुंबीयांनी प्राथमिक आरोग्य केंद्राबाहेर एकच आक्रोश केला.
एक दिवसाच्या अर्भकाला हातात घेऊन कुटुंबीयांनी प्राथमिक आरोग्य केंद्रासमोर निदर्शने केली. दुर्लक्षपणा करणाऱ्या डॉक्टरांवर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली. निकिताचा पती मल्लिकार्जुन मादर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून एफआयआर दाखल करण्यात आला आहे. माळमारुतीचे पोलीस निरीक्षक जे. एम. कालीमिर्ची व त्यांच्या सहकाऱ्यांनी प्राथमिक आरोग्य केंद्राला भेट देऊन या घटनेची माहिती घेतली. शनिवारी सकाळी सिव्हिल हॉस्पिटलमधील शवागारात उत्तरीय तपासणी करून निकिताचा मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. निकिताच्या मृत्यूला डॉक्टरांचा दुर्लक्षपणाच कारणीभूत असल्याचा आरोप करीत शवागाराबाहेरही कुटुंबीयांचा आक्रोश सुरू होता. माळमारुती पोलीस पुढील तपास करीत आहेत.









