व्यवस्थित उपचार न मिळाल्याने मृत्यू झाल्याचा कुटुंबीयांचा आरोप
बेळगाव : हिंडलगा मध्यवर्ती कारागृहातील एका कच्च्या कैद्याचा शनिवारी रात्री सिव्हिल हॉस्पिटलमध्ये मृत्यू झाला आहे. व्यवस्थित उपचार न मिळाल्याने मृत्यू झाल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला आहे. एपीएमसी पोलीस स्थानकात या संबंधी एफआयआर दाखल करण्यात आला आहे. सिद्धाप्पा मोकाप्पा मुत्यान्नावर (वय 38) राहणार हुदली, असे त्याचे नाव आहे. हुदली येथील एका तरुणाच्या खूनप्रकरणी 18 ऑगस्ट रोजी सिद्धाप्पासह दोघांजणांना मारिहाळ पोलिसांनी अटक केली होती. तेव्हापासून त्याला हिंडलगा मध्यवर्ती कारागृहात स्थानबद्धतेत ठेवण्यात आले होते.
29 ऑगस्ट रोजी सिद्धाप्पाला सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल केल्याची कुटुंबीयांना माहिती देण्यात आली. त्यावेळी सिद्धाप्पाची आई व इतर कुटुंबीय सिव्हिल हॉस्पिटलमध्ये पोहोचले. येथे व्यवस्थित उपचार होणार नाहीत. परवानगी घेऊन सिद्धाप्पाला खासगी इस्पितळात दाखल करा, त्याचा खर्च आम्ही भरू असे कुटुंबीयांनी सांगितले. मात्र, कारागृह प्रशासनाने कुटुंबीयांच्या मागणीकडे दुर्लक्ष केले. सिव्हिल हॉस्पिटलमधील डॉक्टरांनीही त्याच्या आरोग्याविषयी व्यवस्थित माहिती दिली नाही. शनिवार दि. 6 सप्टेंबर रोजी रात्री त्याचा मृत्यू झाला.
सिद्धाप्पाला नेमके काय झाले होते, त्याच्यावर कोणते उपचार करण्यात आले. त्याचा मृत्यू कशामुळे झाला यासंबंधी कसलीच माहिती कुटुंबीयांना देण्यात आली नाही. त्यामुळेच उपचारावेळी झालेल्या दुर्लक्षपणामुळे सिद्धाप्पाचा मृत्यू झाल्याचा आरोप त्याची पत्नी आशा हिने जिल्हाधिकारी व पोलीस आयुक्तांकडे केला आहे. रविवार दि. 17 ऑगस्ट रोजी सकाळी हुदली येथील मुत्ताण्णा दुर्गाप्पा गुडबली (वय 22) याच्यावर चाकूहल्ला करण्यात आला होता. पोलिसांनी याप्रकरणी महेश सदानंद नारी (वय 27), सिद्धाप्पा मोकाप्पा मुत्यान्नावर (वय 38), विशाल सदानंद नारी (वय 30) यांच्यावर एफआयआर दाखल करण्यात आले होते. याप्रकरणी हिंडलगा मध्यवर्ती कारागृहात स्थानबद्धतेत ठेवण्यात आलेल्या सिद्धाप्पाचा मृत्यू झाला आहे.









