150 निदर्शकांना अटक : पोलिस अधिकाऱ्याने 17 वर्षीय नाहेलवर झाडली होती गोळी
वृत्तसंस्था /पॅरिस
फ्रान्सची राजधानी पॅरिसचा उपनगरीय भाग नेन्तेरेमध्ये मंगळवारी 17 वर्षीय युवक नाहेलने ट्रॅफिक सिग्नलवर कार न थांबविल्याने पोलिसांनी गोळी झाडली होती. या घटनेनंतर फ्रान्समध्ये हिंसा होत असून लोक बुधवारी रात्रीपासून पॅरिसच्या रस्त्यांवर निदर्शने करत आहेत. निदर्शकांनी अनेक इमारती आणि वाहनांना पेटवून देत पोलिसांवरही हल्ले केले आहेत. तर नाहेलवर गोळी झाडणाऱ्या पोलीस अधिकाऱ्याला अटक करण्यात आली आहे. हिंसेच्या पार्श्वभूमीवर फ्रान्सच्या अंतर्गत सुरक्षा मंत्रालयाने 2 हजार पोलीस कर्मचाऱ्यांना तैनात केले आहे. आतापर्यंत 150 निदर्शकांना अटक करण्यात आली आहे. नेन्तेरे येथील एका रस्त्यावर दोन पोलीस अधिकाऱ्यांनी पिवळ्या रंगाची कार रोखली होती. यादरम्यान वाद झाल्याने पोलीस अधिकाऱ्याने पिस्तूल बाहेर काढत चालक नाहेलवर गोळी झाडली. नाहेलने यानंतर कार वेगाने चालविण्याचा प्रयत्न केला, परंतु त्याची कार काही अंतरावर जाऊन दुर्घटनाग्रस्त झाली आणि यातच त्याचा घटनास्थळी मृत्यू झाला. नाहेल हा 17 वर्षीय होता आणि त्याच्याकडे ड्रायव्हिंग लायसेन्स नव्हते. पोलिसांनी या कारचा पाठलाग करत तिला रोखले होते, परंतु नाहेलने तरीही कार तेथून दुसरीकडे नेण्याचा प्रयत्न केल्यावर पोलीस अधिकाऱ्याने गोळी झाडल्याचे समजते.
अध्यक्षांकडून तातडीची बैठक
फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी हिंसेनंतर तातडीची बैठक बोलाविली आहे. या घटनेने पूर्ण देश हादरून गेला आहे. कुठल्याही प्रकारच्या युक्तिवादाद्वारे अशाप्रकारे युवकाची हत्या योग्य ठरविली जाऊ शकत नसल्याचे मॅक्रॉन यांनी म्हटले आहे. फ्रान्समध्ये खासदारांनी बुधवारी संसदेत एक मिनिटाचे मौन बाळगून नाहेलला श्रद्धांजली वाहिली आहे. गोळीबाराची घटना स्पष्टपणे नियमांचे उल्लंघन आहे. पीडित कुटुंबाने घटनेत सामील अधिकाऱ्यांच्या विरोधात हत्या, हत्येच्या गुन्ह्यात साथ देणे आणि खोटी साक्ष दिल्याप्रकरणी तक्रार नोंदविली असल्याची माहिती पंतप्रधान एलिझाबेथ बॉर्न यांनी दिली आहे.
स्टार फुटबॉलपटूने व्यक्त केले दु:ख
फ्रान्सच्या काही फुटबॉलपटूंसमवेत अन्य सेलिब्रिटींनी या घटनेबद्दल संताप अन् दु:ख व्यक्त केले आहे. या घटनेमुळे मी अत्यंत दु:खी आहे. अशाप्रकारची घटना स्वीकारार्ह ठरू शकत नसल्याचे उद्गार फुटबॉल संघाचा कॅप्टन कायलियन एम्बाप्पेने काढले आहेत.









