गोवावेसजवळ घडली घटना : दक्षिण रहदारी पोलीस स्थानकात एफआयआर
बेळगाव : अनगोळकडे सेवा बजावण्यासाठी सफाई कर्मचारी दुचाकीवरून जाताना खासगी बसने धडक दिल्याने जागीच मृत्यू झाल्याची घटना बुधवारी सायंकाळी 6.30 च्या सुमारास गोवावेस येथे घडली. विनायक सुंदर लाखे (वय 37, रा. ज्योतीनगर, गणेशपूर) असे दुर्दैवी युवकाचे नाव आहे. हिवाळी अधिवेशनाला सुरुवात झाली आहे. त्याकाळात शहरामध्ये स्वच्छता ठेवण्यासाठी सफाई कर्मचाऱ्यांना दोन शिफ्टमध्ये काम देण्यात आले आहे. विनायक हा सकाळी काम करून घरी गेला होता. त्यानंतर सायंकाळच्या शिफ्टसाठी गणेशपूर येथून अनगोळकडे निघाला होता. त्यावेळी खासगी बसने त्याला धडक दिली. रस्त्यावर कोसळून त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने जागीच मृत्यू झाला. या घटनेनंतर दक्षिण रहदारी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. मृतदेह सिव्हिल हॉस्पिटलच्या शवागारामध्ये हलविला. ही माहिती महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना मिळताच आरोग्य अधिकारी डॉ. संजीव नांद्रे यांच्यासह आरोग्य निरीक्षकदेखील दाखल झाले होते. मात्र सकाळीच शवविच्छेदन करण्याचे ठरविण्यात आले. त्यामुळे हे सारे मागे फिरले. या अपघाताची नोंद दक्षिण रहदारी पोलीस स्थानकामध्ये झाली आहे. विनायक हा सफाई कर्मचारी म्हणून काम करत होता. सफाई कर्मचाऱ्यांची नुकतीच कायमस्वरुपी नियुक्ती करण्याची यादी जाहीर झाली होती. त्यामध्ये विनायक याचेही नाव होते, असे सांगण्यात आले. विनायकच्या पश्चात पत्नी, मुले असा परिवार आहे. पोलीस पुढील तपास करीत आहेत.









