पशुसंवर्धन विभागाच्या हालचालींना वेग, शेतकऱ्यांत भीतीचे वातावरण
कराड वार्ताहर
गुजराथ, राजस्थान, हरियाणा व पंजाब राज्यात धुमाकूळ घातेल्या जनावरांतील लम्पी आजाराने सातारा जिल्हय़ात प्रवेश केला असून आतापर्यंत जिल्हय़ातील जवळपास 55 जनावरांना लम्पीची लागण झाली आहे. सोमवारी कराड तालुक्यातील वाघेरी येथील एका बैलाचा लम्पीने मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे. या घटनेमुळे जिल्हय़ाचा पशुवैद्यकीय विभाग व शिरवळच्या पशुवैद्यकीय महाविद्यालयाची टिम वाघेरीत दाखल झाली आहे. या घटनेची माहिती मिळताच आमदार बाळासाहेब पाटील यांनीही वाघेरी येथे भेट देऊन परिस्थितीची माहिती घेऊन पशुवैद्यकीय विभागाला सूचना केल्या.
सातारा, फलटण, खटाव व कराड तालुक्यातील नऊ गावांतील जवळपास 55 जनावरांना लम्पी या चर्मरोग आजाराची लागण झाली आहे. त्यामुळे जिल्हय़ाच्या पशुवैद्यकीय विभागाने युद्धपातळीवर हालचाली सुरू केल्या आहेत. बाधित जनावरांच्या उपचारासह परिसरातील जनावरांचा सर्व्हे करण्यात येत आहे. तसेच बाधित गावातील सर्व जनावरांचे लसीकरण करण्यात येत आहे.
वाघेरी येथील जवळपास 11 जनावरांना लम्पीची लागण झाली आहे. यात गाई व बैलांचा सामावेश आहे. यातील जवळपास 10 जनावरे बरी झाली असून तीन नवीन जनावरांना लम्पीची लागण झाली आहे. तसेच लम्पीची लागण झालेल्या सुलतान पटेल यांच्या बैलाचा सोमवारी सकाळी मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळताच जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. अंकुश परिहार, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. संजय शिंदे, पशुधन विकास अधिकारी डॉ. दुर्गादास उंडगावकर, पशुसंवर्धन साहाय्यक आयुक्त डॉ. दिनकर बोर्डे यांच्यासह शिरवळ येथील पशुवैद्यकीय महाविद्यालयाचे पथक वाघेरीत दाखल झाले आहे.
अधिकारी व पथकाच्या उपस्थितीत मृत बैलाचे शवविच्छेदन करण्यात आले. तसेच नवीन लागण झालेल्या तीन जनावरांची तपासणी व उपचार करण्यात आले. गावातील 866 जनावरांना यापूर्वीच लसीकरण करण्यात आल्याचे पशुसंवर्धन विभागाच्या वतीने सांगण्यात आले.









