अंधत्व येण्याचीही असते भीती
वृक्षांच्या सान्निध्यात राहणे आरोग्यदायी असल्याचे मानले जाते. परंतु एका वृक्षाला जगातील सर्वात विषारी वृक्ष मानले जाते. या वृक्षाला लागणारी फळं खाल्ल्यावर संबंधिताला जीवच गमवावा लागतो.
फ्लोरिडा आणि कॅरेबियन समुद्रादरम्यान किनाऱयांवर आढळून येणाऱया मॅन्सी नील वृक्षाला अत्यंत विषारी मानले जाते. या वृक्षाच्या संपर्कात एखादा माणूस आल्यास त्याच्या शरीरावर फोड उमटू लागतात. या वृक्षावरील फळ एखाद्या छोटय़ा सफरचंदाच्या आकाराचे असते, परंतु याचा एक तुकडा तरी खाल्ला तरी जीव जाऊ शकतो.

या वृक्षाची उंची 50 फुटांपर्यंत असते. या वृक्षाला स्पर्श केल्यावर त्याच हातांनी डोळय़ांना स्पर्श केल्यास माणूस कायमस्वरुपी अंध होऊ शकतो. या वृक्षांच्या आसपास मोठी सावधगिरी बाळगायला लागते. या वृक्षांपासून दूर राहण्याचा सल्ला लोकांना देण्यात येत असतो. हे वृक्ष विषारी मानले जात असले तरीही स्थानिक लोकांमध्ये या वृक्षाची महत्त्वाची भूमिका आहे. हा वृक्ष कॅरेबियन समुद्र किनाऱयांवर आढळून येतो आणि मातीची धूप रोखण्यास याची मोठी मदत होते. तसेच कॅरेबियन कारपेंटर याचा वापर शेकडो वर्षांपासून फर्निचर तयार करण्यासाठी करत आले आहेत. या वृक्षातील विषारी रस संपविण्यासाठी याचे लाकूड उन्हात दीर्घकाळापर्यंत ठेवतात









