नागरिकांना घराबाहेर पडणे झाले अवघड : रोगराई पसरण्याची भीती : समस्या सोडविण्याची मागणी
बेळगाव : अन्नपूर्णेश्वरीनगर, वडगाव येथे मागील तीन दिवसांपासून ड्रेनेज वाहिनीला गळती लागल्याने परिसरात सांडपाणी पसरले आहे. सांडपाण्यामुळे नागरिकांना घराबाहेर पडणेही अवघड झाले असून रोगराई पसरण्याची भीती व्यक्त केली जात आहे. महानगरपालिकेने या समस्येची दखल घेऊन ती सोडविण्यासाठी प्रयत्न करावेत, अशी मागणी स्थानिक नागरिकांमधून होत आहे. आनंदनगर, वडगाव येथून बळ्ळारी नाल्यापर्यंत रस्ता रुंदीकरण व नाल्याचे बांधकाम सुरू आहे. सध्या वडगावातील केएलई चॅरिटेबल हॉस्पिटलनजीक नाल्याचे बांधकाम सुरू आहे. यामुळे वडगावमधून बळ्ळारीच्या दिशेने जाणाऱ्या नाल्यातील ड्रेनेज व गटारीचे सांडपाणी अडविले आहे. पावसाने ड्रेनेज ओव्हर फ्लो होऊन अन्नपूर्णेश्वरीनगरील नववा क्रॉस परिसरात सांडपाणी पसरले आहे. दुर्गंधीयुक्त पाण्यामुळे श्वास घेणे कठीण झाले आहे. ऐन उन्हाळ्यात पाणीसमस्या भेडसावत असतानाच सदर सांडपाणी परिसरातील विहिरीत मिसळल्याने विहिरींचे पाणीही दूषित बनले आहे. यामुळे नागरिकांना बाहेरून पाणी आणावे लागत आहे. बाजूलाच केएलई हॉस्पिटल असून तेथील रुग्णांनाही दुर्गंधीचा सामना करावा लागत आहे. ड्रेनेजचे पाणी उंबऱ्यापर्यंत आले आल्यामुळे नागरिकांना घरातून बाहेर पडणे मुश्कील बनले आहे.
महापालिकेने समस्येकडे लक्ष देण्याची गरज
छत्रपती संभाजीनगर, आनंदनगर, केशवनगर, अन्नपूर्णेश्वरीनगर या भागात थोडा पाऊस पडला तरी घरांमध्ये पाणी शिरते. त्यातच आता ड्रेनेजचे पाणी घरांपर्यंत आल्याने नवीन समस्या निर्माण झाली आहे. काही घरांमध्ये मंगल कार्ये असून ती कशी पार पाडावीत? असा मोठा प्रश्न त्यांच्यासमोर उभा आहे. त्यामुळे महापालिकेने या समस्येकडे लक्ष पुरविण्याची मागणी करण्यात आली आहे.









