वृत्तसंस्था/ जोहान्सबर्ग
दक्षिण आफ्रिकेचा माजी कर्णधार डीन एल्गारने गुरुवारी येथे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली. 26 डिसेंबरपासून सेंच्युरियन येथे यजमान द. आफ्रिका आणि भारत यांच्यातील दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेला प्रारंभ होत आहे. या मालिकेनंतर एल्गार अधिकृत घोषणा करणार आहे.
डीन एल्गारने 2012 साली दक्षिण आफ्रिकेकडून आपले आंतरराष्ट्रीय क्रिकेट पदार्पण करताना 84 कसोटीत द. आफ्रिकेचे प्रतिनिधीत्व केले. डावखुरा फलंदाज म्हणून त्याने आपली ओळख करून दिली. त्याने 84 कसोटीत 37.28 धावांच्या सरासरीने 5146 धावा जमवल्या असून त्यामध्ये 13 शतके आणि 23 अर्धशतकांचा समावेश आहे. सेंच्युरियन येथे भारत आणि द. आफ्रिका यांच्यातील पहिल्या क्रिकेट कसोटीला 26 डिसेंबरपासून प्रारंभ होत आहे. एल्गारचे हे घरचे मैदान असल्याने तो आपल्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील निवृत्तीची अधिकृत घोषणा करणार आहे. 36 वर्षीय एल्गारने 8 वनडे सामन्यात द. आफ्रिकेचे प्रतिनिधीत्व केले असून त्याने 2018 साली आपला शेवटचा सामना खेळला होता. आपल्या 12 वर्षांच्या क्रिकेट कारकीर्दीमध्ये त्याने 19 सामन्यात द. आफ्रिकेचे नेतृत्व केले असून त्यामध्ये 9 सामने जिंकून दिले आहेत.









