पावसामुळे फटका बसल्याचा दावा, आज पालिकेला भेट देऊन विनंती करणार
प्रतिनिधी /मडगाव
मडगावातील होली स्पिरीट चर्चच्या फेस्तानिमित्त मडगाव पालिकेने फेरी भरविण्यासाठी दिलेली मुदत काल रविवारी संपली असली, तरी मागील तीन दिवस पावसामुळे स्टॉलचालकांचा व्यवसाय व्यवस्थित न झाल्याने तीन दिवसांची फेरीस मुदतवाढ द्यावी, अशी मागणी बहुतेक विक्रेत्यांनी केली आहे.
रविवारी प्रसारमाध्यमांशी बोलताना काही स्टॉलचालकांनी पावसामुळे फेरी भरविलेल्या मैदानावर पावसाचे पाणी साचून चिखलसदृश परिस्थिती निर्माण झाल्यामुळे ग्राहक येथे फिरकलेच नसल्याचा दावा केला. पावसामुळे आमच्या दुकानांमध्ये पाणी शिरून कपडे व विक्रीसाठी आणलेले अन्य साहित्य खराब झाल्याचा दावाही काहींनी केला. पालिकेला दिलेले भाडे तसेच कंत्राटदाराला भरलेला सोपो याचे पैसे देखील वसूल न झाल्याची कैफियत मीरा सुतार या स्टॉलचालक महिलेने मांडली.
मडगाव पालिकेचे मुख्याधिकारी रोहित कदम तसेच पालिकेच्या संबंधित नगरसेवकांनी यात लक्ष घालून किमान दोन-तीन दिवस मुदतवाढ देण्यासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन या फेस्ताच्या फेरीतील विक्रेत्यांनी केले आहे. यासंदर्भात आज सोमवारी या विक्रेत्यांनी मडगाव पालिकेला भेट देऊन मुख्याधिकारी व नगराध्यक्षांना विनंती करण्याचे ठरविले आहे.









