3 स्कॉर्पियन पाणबुड्याही खरेदी करणार : पाकिस्तानच्या नौदलाला मजबूत करतोय चीन
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
फ्रान्ससोबत नेव्ही वेरिएंटयुक्त 26 राफेल-एम लढाऊ विमानांसाठीच्या वाटाघाटी अंतिम टप्प्यात पोहोचली आहे. तसेच 3 स्कॉर्पियन पाणबुड्यांच्या व्यवहाराची चर्चाही अंतिम टप्प्यात आहे. पुढील महिन्यात हा व्यवहार निश्चित होण्याची शक्यता असल्याचे नौदल प्रमुख अॅडमिरल दिनेश कुमार त्रिपाठी यांनी सोमवारी सांगितले आहे. नौदलाची शक्ती वाढविण्याच्या प्रयत्नांच्या अंतर्गत सद्यकाळात 62 युद्धनौका आणि एका पाणबुडीची निर्मिती देशातच केली जात असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
पुढील एक वर्षात मोठ्या संख्येत युद्धनौका आणि पाणबुडी नौदलात सामील होतील. केंद्र सरकारने अणुऊर्जेने संचालित पाणबुड्यांसाठी मंजुरी दिली आहे. निर्मितीच्या स्वदेशी क्षमतेवर सरकारला विश्वास असल्याचे यातून स्पष्ट होते. नौदलात आम्ही अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वेगाने विस्तार करत आहोत असे नौदलप्रमुखांनी म्हटले आहे. मागील वर्षी जुलै महिन्यात संरक्षण मंत्रालयाने फ्रान्सकडून राफेल-एम लढाऊ विमानांच्या खरेदीला मंजुरी दिली होती. या विमानाचा वापर प्रामुख्याने स्वदेशनिर्मित विमानवाहू युद्धनौका आयएनएस विक्रांतवर तैनात करण्यासाठी केला जाणार आहे.
भारतात निर्मित पहिली अणुऊर्जेने संचालित पाणबुडी (एसएसएन) 2036-37 पर्यंत नौदलाच्या ताफ्यात सामील होणार आहे. याच्या निर्मितीसाठी दोन महिन्यांपूर्वीच सरकारकडून मंजुरी मिळाली होती. पहिली पाणबुडी ताफ्यात ामील झाल्याच्या दोन वर्षांच्या आत दुसऱ्या पाणबुडीलाही सामील केले जाईल. भारतीय नौदल अशाप्रकारच्या 6 पाणबुड्या तयार करविणार असल्याचे त्रिपाठी यांनी सांगितले.
सागरी आघाडीवर दोन शत्रू एकत्र
चीन हा पाकिस्तानला नौदलाच्या विस्तारात सक्रीय स्वरुपात मदत करत आहे. चीन पाकिस्तानला नव्या पाणबुडींचा पुरवठा करत असून युद्धनौकांच्या निर्मितीही सहाय्य करत आहे. पाकिस्तानचे नौदल चीनच्या मदतीने अनेक युद्धनौका आणि पाणबुडी तयार करत आहे. भारत पाकिस्तानच्या सामर्थ्याला ओळखून असून त्यानुसारच स्वत:च्या संरक्षण रणनीतिंमध्ये बदल करण्यात आले आहेत. आम्ही आमच्या शेजाऱ्यांकडून निर्माण होणाऱ्या सर्व धोक्यांना सामोरे जाण्याची तयारी करत आहोत. पाकिस्तान स्वत:च्या लोकांच्या विकासाच्या तुलनेत शस्त्रास्त्रांना प्राथमिकता देत आहे, असे अॅडमिरल त्रिपाठी यांनी म्हटले आहे.









