प्रतिनिधी /बेळगाव
बेळगाव-वेंगुर्ला मार्गावर अरगन तलावानजीक रस्त्याशेजारी भलामोठा खड्डा पडल्याने वाहतूक धोकादायक ठरत आहे. रस्त्याशेजारी असलेला खड्डा सहजासहजी नजरेस पडत नसल्याने अपघाताची शक्मयता व्यक्त होत आहे.
बेळगाव-वेंगुर्ला मार्गावर अरगन तलावात पाणी सोडण्यासाठी या ठिकाणी चरीची व्यवस्था केली गेली आहे. मात्र, पाण्याच्या प्रवाहामुळे या ठिकाणची ही चर मोठी होऊन तिचे खड्डय़ात रुपांतर झाले आहे. हा खड्डा रस्त्याशेजारीच असल्याने रात्रीच्या अंधारात धोका निर्माण होत आहे. दरम्यान, या खड्डय़ात पाणी साचून असल्यामुळे त्याच्या खोलीचा अंदाज येत नाही. सदर खड्डा वाढत जाऊन डांबरी रस्त्याला येऊन टेकला आहे. दूरवरून या खड्डय़ाचा अंदाज वाहनचालकांना अजिबात येत नाही. परिणामी खड्डय़ाजवळून वाहन गेल्यास अपघात घडून मृत्यू ओढवण्याची चिंता नागरिकांतून व्यक्त होत आहे.
लक्ष्मी टेकडीवरील पाणी शुद्धीकरण केंद्रातून बाहेर पडणारे अतिरिक्त पाणी अरगन तलावात सोडण्यात येते. बेळगाव-वेंगुर्ला रोडच्या खालून हे पाणी तलावात जाऊन साठते. मात्र, सततच्या पाण्याच्या प्रवाहामुळे भलामोठा खड्डा निर्माण झाला आहे. या मार्गावर सतत वाहनांची वर्दळ असते. कोकण, पश्चिम महाराष्ट्रातील चंदगड, आजरा, नेसरी, गडहिंग्लज भागातील नागरिकांची येथूनच मोठय़ा प्रमाणात रहदारी असते. त्यामुळे हा खड्डा आता धोकादायक ठरू लागला आहे. एखाद्याचा बळी जाण्यापूर्वी खड्डय़ात भराव घालून आणि पाईपलाईनची दुरुस्ती करण्याची मागणी होत आहे.









