पोलिसांनी मृत अर्भक ताब्यात घेऊन पुढील तपास सुरू केला आहे.
सांगली : सांगलीजवळील समडोळी गावात एक धक्कादायक घटना समोर आली असून, चांदोली वसाहतीजवळील गटारीत स्त्री जातीचे मृत अर्भक आढळल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. ही घटना उघडकीस येताच स्थानिक नागरिकांनी तात्काळ पोलिसांना कळवले.
प्राथमिक माहितीनुसार, चांदोली वसाहत परिसरातील गटारीमध्ये अर्भक मृतावस्थेत सापडले. घटनेची माहिती मिळताच सांगली ग्रामीण पोलीस ठाण्याचे अधिकारी व कर्मचारी तत्काळ घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी मृत अर्भक ताब्यात घेऊन पुढील तपास सुरू केला आहे.
सदर प्रकरणात अर्भक कोण टाकून गेले, त्यामागील कारण काय, तसेच अर्भक जन्मल्यानंतर जिवंत होते की मृतावस्थेतच फेकण्यात आले. यासंबंधी अनेक शंका आणि चर्चा रंगू लागल्या आहेत. पोलिसांनी अर्भकाचे शवविच्छेदन करण्यासाठी ते शासकीय रुग्णालयात पाठवले असून, शवविच्छेदन अहवालानंतरच मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होणार आहे.
या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून, संबंधित आरोपीचा लवकरात लवकर शोध घेऊन कठोर कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून केली जात आहे.








